
पुणे : मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. गोळीबाराच्या घटनेनंतर दोशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोशी यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. गृह विभागाने सोमावारी सायंकाळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले.
या पोलीस अधिकाऱ्यांच्या केली बदली
पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथे बदली केली. तर सीआयडीतील उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती झाली. पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून, लोहमार्ग पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांची अमरावती येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. माधुरी केदार यांची लोहमार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.
मराठा आऱक्षणावरून राज्यभर मनोज जरांगेंचा दौरा
गेले अनेक दिवसांपासून मराठा आऱक्षणावरून राज्यभर आंदोलन पेटलेले असताना, मनोज जरांगेंनी सरकारला 2 जानेवारी 2024 पर्यंतचे अल्टीमेटम दिलेले आहे. असे असताना आता सरकारच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, हे आंदोलन अंतरवली सराटी येथून सुरू झाले होते. पोलिसांच्या लाठीमारानंतर आणि गोळीबारानंतर हे आंदोलन चांगलेच पेटले. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर राज्यभरातून टीका झाली. अनेक राजकीय नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत, कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती. आता त्यातील पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्याच्या सीआयडीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.