गावांमध्ये होतेय पाण्याची चोरी! देवगडमध्ये नागरिकांना गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा

देवगड किल्ला भागामध्ये काही दिवसांपासून नळाला गढूळ आणि दूषित पाणीचा पुरवठा केला जात आहे. भाजपच्या नगरसेवकांनी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष

    देवगड : देवगड प्रादेशिक नळ योजनेचे देवगड किल्ला भागामध्ये नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी येत आहे. या पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपा नगरसेवकांनी मुख्याधिकारी सूरज कांबळे यांचे लक्ष वेधले.

    भाजपचे गटनेते शरद टूकरूल, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी नगराध्यक्षा आणि नगरसेविका ऍड प्रणाली माने, नगरसेविका तन्वी चांदोसकर, मनीषा जामसंडेकर, ऋचाली पाटकर, नगरसेवक व्हि. सी.खडपकर,भाजप महिला तालुकाध्यक्षा उष:कला केळुस्कर, अमित गोळवणकर, राजू कावले उपस्थित होते. यावेळी भाजपा नगरसेवकांनी किल्ला भागातील लोकांना नळाला येत असलेले गढूळ पाणी बॉटलमध्ये भरून आणले होते. हे गढूळ पाणी मुख्याधिकाऱ्यांना दाखवत हे पाणी लोकांनी प्यावे का? यामुळे कावीळ आणि अन्य आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली.

    पुढे त्यांनी सांगितले की, पाणी पुरवठा विभागाचे श्री चारुदत्त पारकर यांनी नळयोजना अत्यंत जीर्ण आहेत. ही पाईप लाईन 1980 ते 90 मधील जुनी पाईपलाईन आहे. गटाराच्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गटारातील गढूळ आणि दूषित पाणी पाईपलाईन वाटे जात आहे. तसेच नळयोजना असलेल्या अन्नपूर्णा नदीचे पात्र कोरडे झाले असल्याने गढूळ पाणी येत आहे. यावर उपाय म्हणून नळावाटे येणारे पहिले १० मिनिटांचे पाणी पिण्यासाठी वापरू नये. त्यानंतर आलेले शुद्ध पाणी वापरावे, असे झाले तर हा प्रश्न सुटू शकतो.

    नदीतील गाळ काढण्याचे काम दोन दिवसांत हाती घेण्यात येणार आहे. यावेळी देखील नळाला गढूळ पाणी येणार असेही ते म्हणाले. यावेळी नगरसेविका प्रणाली माने म्हणाल्या की, पाण्यामध्ये टीसीएल पावडर आणि तुरटी फिरविण्यात यावी अशी मागणी केली. दहिबांव अन्नपूर्णा नदीचे पात्र कोरडे झाले असल्याने शिरगाव पाडागर योजनेचे पाणी उपसा केले जात आहे. मात्र या योजनेवर असलेले 9 गावातील लोक पाणी चोरत असल्याने देवगडला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. पाणी चोरी होत असल्याने रात्रभर कर्मचारी गस्त घालत आहे. तरीही काही लोक पाणी चोरत आहेत. किमान पाच ठिकाणी पाणी चोरले जाते असे पारकर यांनी सांगितले. तसेच ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.