jayant patil and eknath shinde

काळ बदलला आहे, न्याय बदलला आहे. जे न्याय देतील अशी अपेक्षा असते तेच डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत आहेत असे लोकं म्हणत आहे. एक पक्षच पळवण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे असा घणाघातही जयंत पाटील यांनी केला.

सांगली – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ८ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली मात्र तरीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की पक्षच शिंदेंचा असल्याने निलंबनाचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil|) यांनी व्यक्त केली. काल सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध वॉर्डातील विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

डोळ्यावर पट्टी बांधून न्याय
काळ बदलला आहे, न्याय बदलला आहे. जे न्याय देतील अशी अपेक्षा असते तेच डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत आहेत असे लोकं म्हणत आहे. एक पक्षच पळवण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे असा घणाघातही जयंत पाटील यांनी केला. आता न्याय जनतेच्या न्यायालयातच जाऊन करावे लागेल. इंदिरा गांधी यांचा याच जनतेने पराभव केला आणि याच जनतेने त्यांना डोक्यावर बसवले असेही जयंत पाटील म्हणाले.

आता चौथ्या स्तंभालाही उद्ध्वस्त
गोध्रा हत्याकांडाची डॉक्युमेंटरी बीबीसी वाहिनीने बनवली म्हणून याच बीबीसी वाहिनीच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सची धाड घालण्यात आली. म्हणजे जे विरोधात बोलतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या देशात आता चौथ्या स्तंभालाही उद्ध्वस्त करण्यात येत आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. भारताच्या नागरिकांनी आता सावध रहायला हवे. कमळाच्या फुलापासून दूर रहा, कमळाचं फुल लांबून दिसायला चांगलं दिसतं त्याला फक्त लांबूनच पहा असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला