Supreme Court of India vs Delhi High Court final in 26th Lawyers National Cricket Tournament

  पुणे : नेशन वाईड लॉयर्स क्रिकेट संघटना आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या वकीलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया आणि दिल्ली हायकोर्ट संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. हा अंतिम सामना आज (शुक्रवारी, २९ डिसेंबर २०२३ रोजी) महाराष्ट्र क्रिकेट संघटेनेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान गहूंजे येथे सकाळी १० वाजता होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संचालक उमेश चांडोले यांनी सांगितले.

  तेलंगणा हायकोर्ट संघाचा १३१ धावांनी पराभव

  डेक्कन जिमखाना क्लब येथे झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात राजबीर पनवर याच्या नाबाद १२५ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाने तेलंगणा हायकोर्ट संघाचा १३१ धावांनी पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१६ धावांचा डोंगर उभा केला. राजबीर पनवर याने आजही जबरदस्त फलंदाजी करताना ५८ चेंडूत १२ चौकार आणि ९ षटकारांसह १२५ धावांची खेळी केली. काल याच मैदानावर राजबीर याने नाबाद १४९ धावांची खेळी करून स्पर्धेतील पहिले शतक नोंदविले होते.

  तेलंगणा संघाच्या गोलंदाजांची वाताहत

  आज त्याने सलग दुसरे शतक नोंदवित आपला फॉर्मने तेलंगणा संघाच्या गोलंदाजांची वाताहत केली. शक्ती भक्ती (३१ धावा) आणि कुणाल सिंग (नाबाद ३४ धावा) यांनी दुसर्‍या बाजूने राजबीर याला सुरेख साथ दिली. या आव्हानासमोर तेलंगणा हायकोर्ट संघाचा डाव ८५ धावांवर गडगडला. सुप्रिम कोर्ट संघाच्या मनीष लांबा याने १३ धावात ५ गडी बाद केले.

  उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात वरूण वर्मा याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्ली हायकोर्ट संघाने अलाहाबाद हायकोर्ट संघाचा ३२ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली हायकोर्ट संघाने १९३ धावा धावफलकावर लावल्या. गोल्डी राव (६० धावा), वरूण वर्मा (नाबाद ४१ धावा) आणि अक्षय सिंग (३३ धावा) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानासमोर अलाहाबाद हायकोर्ट संघाचा डाव १६१ धावांवर मर्यादित राहीला. आकाश सिंग याने ५७ धावांची खेळी केली.

  काल मोशी येथील हजारे क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात विवेक देशमुख याच्या नाबाद ५८ धावांच्या जोरावर महाराष्ट्र हायकोर्ट संघाने केरळ हायकोर्ट संघाचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यामध्ये जिंकूनही केवळ धावगती कमी असल्याने महाराष्ट्र संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. या गटातून तेलंगणा संघाने ४ गुण आणि १.२७ अशा सरस धावगतीच्या आधारे उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश निश्‍चित केला. महाराष्ट्र संघाचे ४ गुण आणि १.१५ अशी धावगती होती.

  सामन्याचा संक्षिप्त निकाल : उपांत्य फेरी :
  दिल्ली हायकोर्ट संघः २० षटकात ६ गडी बाद १९३ धावा (गोल्डी राव ६० (३५, ७ चौकार, २ षटकार), वरूण वर्मा नाबाद ४१, अक्षय सिंग ३३, हेमंत चहर २-४२) वि.वि. अलाहाबाद हायकोर्ट संघः २० षटकात ८ गडी बाद १६१ धावा (आकाश सिंग ५७ (४०, ७ चौकार, १ षटकार), आझाद राणा २१, वरूण वर्मा २-२०, नवीन सिंग २-२४); सामनावीरः वरूण वर्मा;

  सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघ : २० षटकात ४ गडी बाद २१६ धावा (राजबीर पनवर १२५ (५८, १२ चौकार, ९ षटकार), शक्ती भक्ती ३१, कुणाल सिंग नाबाद ३४, राहूल तापडीया १-४७);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी राजबीर आणि शक्ती यांच्यात ९२ (५५); वि.वि. तेलंगणा हायकोर्ट संघः १८.२ षटकात १० गडी बाद ८५ धावा (सुमन गौड १२, पीके आदित्य नाबाद १८, मनीष लांबा ५-१३, अक्षय कुमार २-२४); सामनावीरः राजबीर पनवर