निलेश लंकेंना अजित पवार यांचा थेट इशारा; सुप्रिया सुळेंनी ‘दादां’ना सुनावले खडेबोल

जाहीर प्रचारामध्ये अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशारा दिला. यावरुन आता निलेश लंके यांच्यासाठी सुप्रिया सुळे धावून आल्या आहेत.

    अहमदनगर : लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान लवकरच पार पडणार आहे. आज चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण जोरदार रंगले असून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. निवडणूकीपूर्वी अजित पवार गटामध्ये असणाऱ्या निलेश लंके हे अहमदनगरच्या उमेदवारीसाठी शरद पवार गटामध्ये सामील झाले. त्यानंतर जाहीर प्रचारामध्ये अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशारा दिला. यावरुन आता निलेश लंके यांच्यासाठी सुप्रिया सुळे धावून आल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी धमकी दिल्याबद्दल अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत.

    अजित पवार यांनी काय दिला होता इशारा?

    अजित पवार प्रचारसभेमध्ये निलेश लंके यांना जाहीर इशारा दिला अजित पवार म्हणाले, “अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर धमक्या दिल्या, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझी अशी जिरवीन, की पुन्हा तु्ला सतत अजित पवारच डोळ्यांसमोर दिसेल. तू माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्याचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू किस झाड की पत्ती है? तू काय समजतोस स्वत:ला?” असा इशाराच अजित पवारांनी दिला.

    सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर

    यावरुन महाविकास आघाडीकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. अजित पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील उत्तर दिले. अजित पवार यांचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी भाषणामध्ये धमकी देण्याबाबत उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ते म्हणतात मी सकाळी लवकर उठतो. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात. आणि दमदाटीचं राहू द्या. कोण घाबरत नाही त्याला. आजच्या सभेत तर कुणीतरी त्यांचं भाषण चालू असतानाच समोरून म्हणाला, ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’. दमदाटी केली तर ती सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही ती खपवून घेणार नाही. निलेश लंकेला जे दमदाटी करतात त्यांना मला विनम्रपणे सांगायचं आहे, दमदाटी तुमच्या घरात चालवा, बाहेर नका चालवू” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता खडेबोल सुनावले आहेत.