मुख्यमंत्र्यांच्या ज्योतिषी भेटीवर सुप्रिया सुळे यांना नरेंद्र दाभोळकर यांची आठवण

मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. तसेच, ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा उल्लेख करत अंधश्रद्धेवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.

    मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बुधवारी शिर्डीला (Shirdi) गेले असताना अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील (Sinnar) ईशान्येश्वर (Ishaneshwar Temple) मंदिराला भेट दिली. तसेच, ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून (Astrology) आपले भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा उल्लेख करत अंधश्रद्धेवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येकाची श्रद्धा असते. श्रद्धेवर आमचा सर्वांचा विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी अंधश्रद्धेविरोधात खूप मोठे काम या राज्यात आणि देशात उभे केले. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले. त्यामुळे महत्त्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे; मात्र, अंधश्रद्धेवर महाराष्ट्रात एक वेगळे मत आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

    तर, आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो. प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते, विश्वास असतो त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या बातम्या आल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे माहिती नाही. त्यामुळे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केली पाहिजे, अजित पवार म्हणाले.