‘…तर अजित पवार मलाच मतदान करतील’; असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे?

बारामतीमध्ये अजित पवारांनी विद्यमान खासदार अर्थात सुप्रिया सुळेंवर विकासनिधीच्या बाबतीत टीका केली असताना आता सुप्रिया सुळेंनीही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

    पुणे – लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार असल्यामुळे जोरदार प्रचार सुरु आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे व अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार दोघीही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. बारामतीमध्ये अजित पवारांनी विद्यमान खासदार अर्थात सुप्रिया सुळेंवर विकासनिधीच्या बाबतीत टीका केली असताना आता सुप्रिया सुळेंनीही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

    समोर कोण लढतंय, याचा मी फारसा विचार नाही

    माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. घरातल्याच उमेवार सुनेत्रा पवार यांच्यामुळे बारामतीतलं आव्हान अधिक खडतर झालंय का? असा सवाल माध्यमांनी विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी चोख उत्तर दिले. खासदार सुळे म्हणाल्या, ही माझी वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई वैचारिक आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे. त्यामुळे समोर कोण लढतंय, याचा मी फारसा विचार करतच नाही. मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका करत नाही. माझ्यावर हे संस्कारच नाहीयेत” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

    मलाच मतदान करतील

    त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार देखील मलाच मतदार करतील असा दावा केला आहे. अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर विकासनिधीचा वापर केला नसल्याचा आरोप केला होता. बारामतीच्या विकासनिधीवरुन राजकारण रंगलेले असताना सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुळे म्हणाल्या, “कदाचित माझा मराठीतला कार्य अहवाल वाचला नसावा. मी आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देईन. त्यांनी यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर उद्या सकाळी ते मेरीटवर मलाच मतदान करतील” अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.