वय हा फक्त आकडा ! सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेल यांच्या पोस्टवर षटकार

शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा हा सध्या चर्चेमध्ये आला आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांच्या वय हा फक्त आकडा आहे या आशयाच्या पोस्टवर रिप्लाय करत षटकार लगावला आहे.

    मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय मतभेदातून राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंड करत भाजपसोबत (BJP) युती केली. यानंतर अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) यांचे वय झाले आहे.त्यांनी आता थांबायला हवं या आशयाचे विधान केले जात होते. त्यामुळे शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा हा सध्या चर्चेमध्ये आला आहे. यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या वय हा फक्त आकडा आहे या आशयाच्या पोस्टवर रिप्लाय करत षटकार लगावला आहे.

    अजित पवार गटामध्ये सामील झालेले प्रफुल्ल पटेल यांनी एका महिला खेळाडूचे अभिनंदन करताना ट्वीटवर खास पोस्ट लिहिली. यामध्ये पटेल यांनी लिहिले की, उत्कटतेचा आणि दृढनिश्चयाचा विचार केल्यास वय हा फक्त एक आकडा आहे! हरियाणातील कदमा गावातील 107 वर्षीय ॲथलीट रामबाईने हे सिद्ध केले आहे की, स्वप्नांना कोणतीही एक्सपायरी डेट नसते. हैदराबाद येथील नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील त्यांची दोन सुवर्णपदके त्यांच्या समर्पणाचा पुरावा आहेत. त्यांच्या उदाहरणातून आपणही प्रेरणा घेऊया आणि आपल्याला आठवण करून द्या की आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास कधीही उशीर झालेला नाही! अशी पोस्ट प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवर केली. याचा फायदा घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

    सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या वय हा फक्त आकडा असतो या आशयाच्या पोस्टवर रिप्लाय केला. सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे की, मी तुमच्याही पूर्णपणे सहमत आहे. वय हा फक्त आकडा आहे. असा रिप्लाय सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंनी लगावलेला हा टोला व्हायरल होत आहे.