अजित पवार शरद पवारांकडे परत आले तर काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एखाद्याने…”

अजित पवार परत येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरच आता शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    बारामती – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार गट व अजित पवार गट निर्माण झाले आहे. अजित पवार हे थेट सत्तेमध्ये सामील झाल्यामुळे सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. अजित पवार परत येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरच आता शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना अजित पवार शरद पवारांकडे परत आले तर काय? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांचे उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी मी जर तरच्या गोष्टींचा विचार करत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.“अजित पवार परत आले तर काय? या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. मी जर तरच्या गोष्टींचा विचार करत नाही. मी वास्तवतेत जगणारी व्यक्ती आहे. अजित पवारांनी आता वेगळी वैचारिक भूमिका घेतली आहे. त्यामुळे एखाद्याने एखादी वैचारिक भूमिका घेतली असेल, त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

    काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न शरद पवार यांनाही विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. “भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली, तर आधीच्या अनुभवावरून आलेला शहाणपणा स्वीकारायचा असतो”, अशा सूचक शब्दांत त्यांनी उत्तर दिले होते.