
ठाकरे गटाच्या (Thackeray Faction) महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) साताऱ्यातील एका कार्यक्रमात भाषण देताना ढसाढसा रडल्या. साताऱ्यामध्ये भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात समाज, वंचित, भटक्या जाती यांच्याविषयी भाषण देताना सुषमा अंधारे यांनी त्यांचे अनुभव सांगितले. हे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.
सातारा : साताऱ्यामध्ये भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सभेदरम्यान त्यांना भाषण करताना, अश्रू अनावर झाले.
या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी असे सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे, असे सांगत सुषमा अंधारे या भावुक झाल्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी हजेरी लावली होती. शरद पवारांच्या समोरच त्यांना अश्रू अनावर झाले. तसेच, महाविकास आघाडीमध्ये सर तुम्ही असायला हवं. असे आवाहन त्यांनी शरद पवारांना केले आहे.
सुषमा अंधारेंनी सांगितले की, मला भटक्या विमुक्तांच्या काही व्यथा मांडायच्या नाहीत. पण जागतिकीकरणात भटके जास्त विस्थापित झाले आहेत. इतक्या जाती आहेत तर काहींना अशीपण जात आहे का? असं आश्चर्य वाटते. सध्या शहरातील लोकांना वयाच्या पाचव्या, सहाव्या वर्षात संगणक हाताळायला मिळत आहे. पण यांना कुठे ते कळतं? मी माझे एमए शिक्षण पूर्ण केल्यावर मला कम्प्युटरचा डबा पाहायला मिळाला. भटक्या जातीतील अनेक लोकं आहेत की जी संधी मिळाली की मोठी होतात.’
सुषमा अंधारेंनी पुढे सांगितले की, माझी अडचण होत होती की मी किती ही ओरडले तरी माझा आवाज जात नव्हता. उद्धव साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी मला माझे मुद्दे मांडायला दिले. शरद पवारसाहेबांच्या पुढे मी धाडसाने बोलते आहे कारण आम्ही झोपड्यातील माणसं आहोत.
आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्यावर टिप्पणी करत असताना एकाही पोलिस ठाण्यात त्याची तक्रार लिहून घेतली गेली नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. सार्वजनिक ठिकाणी हा सगळा कंटेंट आहे. सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी यासंबंधी प्रश्न विचारायला हवा होता. माझं चुकत असेल तर कान पकडा. मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे.’ असे रडत रडत सुषमा अंधारेंनी सांगितले.
पुढे त्यांनी सांगितलं की, आमचा असाही कोणी आधार नाही. आम्ही मंत्रीपद वैगैरे डोक्यात ठेवून राजकारणात आलेलो नाही. भटक्यांना आधार असावा, आमचे प्रश्न मांडणारं कोणीतरी असावं यासाठी आलो आहोत. सगळे बोलतात माझ्या बोलण्यात रग आहे. याचं कारण माझ्यात धग आहे. पण लोक माझ्या बापापर्यंत जातात, वाटेल ते बोलतात. साहेब हे तुमच्या समोर मांडले पाहिजे.’