महिलेच्या खून प्रकरणातील संशयिताचा घातपात?; कराडात चर्चांना उधाण

वनवासमाची (ता. कराड) येथील लता चव्हाण या ४५ वर्षीय विवाहितेचा महिलादिनाच्या पूर्वसंध्येला गळा आवळून खून (Murder in Karad) करण्यात आला होता. या खून प्रकरणातील संशयित आरोपी नामदेव सुतार (वय ६५) यांचा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे.

कराड : वनवासमाची (ता. कराड) येथील लता चव्हाण या ४५ वर्षीय विवाहितेचा महिलादिनाच्या पूर्वसंध्येला गळा आवळून खून (Murder in Karad) करण्यात आला होता. या खून प्रकरणातील संशयित आरोपी नामदेव सुतार (वय ६५) यांचा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेने महिलेच्या खुनाचा गुंता अधिकच वाढला आहे. मृत संशयिताची १४ व १५ रोजी सलग दोन दिवस तळबीड पोलीस चौकशी करत होते. त्यानंतर ते घरातून न सांगता निघून गेले. १७ रोजी त्यांचा मृतदेह मिळून आल्याने हा घातपात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील अक्षय पाटील यांनी तळबीड पोलिसात दिली आहे.

तळबीड पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, नामदेव तुकाराम सुतार (वय ६५) आहे. मंगळवार १४ व १५ मार्च रोजी त्यांची पोलिसांनी लता चव्हाण खून प्रकरणासंदर्भात चौकशी केली आहे. परंतु, गुरुवारपासून ते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. १७ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बेलवडे हवेली (ता.कराड) येथील मळी नावाच्या शिवारात कृष्णा नदी पात्राकडेला त्यांचा पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कराड तालुक्यातील वनवासमाची येथील डोंगराच्या वघळीत ४५ वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून डोक्यात दगड मारून निर्दयीपणे खून केल्याची घटना साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. खुनामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने पोलीस मारेकऱ्याच्या शोधात सुमारे १४ ते १५ जणांची चौकशी केली आहे.

दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर दहा दिवसांत तळबीड पोलिसांसह सातारा जिल्हा पोलीस दलातील विविध विभागामार्फत तसेच पथकांच्या माध्यमातून कसून चौकशी सुरू आहे. काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप या खुनामागचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. लता मधुकर चव्हाण (वय ४५) रा. वनवासमाची, ता. कराड असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. फिर्याद पती प्रशांत चव्हाण यांनी दिली आहे.

खरा आरोपी जेरबंद होणार?

लता चव्हाण यांचा निर्जनस्थळी झालेल्या खुनाच्या घटनेने पोलीस यंत्रणा हादरुन गेली आहे. सर्व बाजूंनी यंत्रणांचा वापर करुन तपास सुरू आहे. अद्याप कारण अस्पष्ट असले तरी काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांकडून मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. परंतु, एका संशयिताचा मृत्यू झाल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरा आरोपी जेरबंद होणार का? याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आकस्मित मृत्यूची नोंद

नामदेव सुतार यांचा मृतदेह कृष्णा नदीकाठी बेलवडे हवेली गावच्या हद्दीमध्ये मिळून आला आहे. याप्रकरणी गावचे पोलीस पाटील अक्षय पाटील यांनी फिर्याद दिली असून आकस्मित मृत्यूची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी दिली. दरम्यान, मृत व्यक्ती लता चव्हाण खून प्रकरणातील संशयित असल्याने तपासी अधिकारी कराड पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र संपर्क होऊ शकला नाही.