‘शिवसेनेच्या बंडखोर ३९ आमदारांना निलंबित करा; विधानसभा अध्यक्षांना पत्र

या निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

    मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

    याबद्दल भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबद्दल शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार देऊन अध्यक्षांना सांगितले की हे सर्व माझ्या समोर घडले आहे, असे जाधव यांनी म्हटलं आहे.

    लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक झाली. पण, विधानसभेच्या नियमानुसार, पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्या व्हीपच्या विरोधात 39 आमदारांनी मतदान केलं आहे. आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही आधीच याचिका दाखल केली आहे. आधीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली.