MP Navneet Rana's complaint and notice to Amravati and Mumbai Police Commissioners

जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच ८ ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

    मुंबई : अमरावतीमध्ये नवनीत राणा ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतु, राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा केला होता आणि निवडणूक लढवली होती. मात्र, शाळा सोडल्याच्या खोटय़ा दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यातच २३ सप्टेंबर रोजी शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले होते.

    याआधी २२ ऑगस्ट रोजीही न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, त्यानंतर ते तीन दिवसांनी न्यायालयात हजर राहिल्यावर न्यायालयाने वॉरंट रद्द करून त्यांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठावला होता. राणा आणि त्यांच्या वडिलांवर आरोप निश्चित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती मिळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांना दिलासा अंतरिम देत ८ ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कठोर करावाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.