
कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीमधून 63 मुस्लिम मुलांना संशयितरीत्या घेऊन जाणारा ट्रक भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) पदाधिकाऱ्यांनी अडवला. त्यानंतर हा ट्रक शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. ही माहिती मिळताच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला.
शिरोली : कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीमधून 63 मुस्लिम मुलांना संशयितरीत्या घेऊन जाणारा ट्रक भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) पदाधिकाऱ्यांनी अडवला. त्यानंतर हा ट्रक शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. ही माहिती मिळताच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला.
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सुचनेनुसार कोल्हापूर शहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण तपासले जात आहे. विषयाचे गांभीर्य, हिंदुत्ववादी संघटनांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मुस्लिम मुलांची मोठी संख्या या सर्व कारणांमुळे पोलीस बंदोबस्तात हा ट्रक शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आला. याबाबतचे सर्व सोपस्कार पूर्ण करत चाइल्ड वेल्फेअर कमिटी (सीडब्ल्यूसी ) च्या अधिकाऱ्यांना पाचारण करत हे प्रकरण वर्ग करण्यात आले. मुलांची वाहतूक करणारा ट्रक शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आला आहे. तर सर्व मुलांना पोलीस व्हॅन मधून बाल सुधार समितीकडे सोपविण्यात आले.
याबाबत घटनास्थळी व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, रुईकर कॉलनी, कोल्हापूर येथील बँक ऑफ बडोदाच्या पश्चिमेस बुधवारी सकाळी एक ट्रक उभा होता. बाहेरून रिक्षामधून येणारी मुस्लिम मुले या ट्रकमध्ये चढून बसत होती. सुमारे दोन तास हा ट्रक तिथेच उभा असल्याने आणि सातत्याने मुस्लिम मुले तिथे येत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य विजेंद्र माने व जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे यांच्या मनात संशय आला. म्हणून त्यांनी याबाबत ट्रक चालकाकडे विचारपूस केली. मात्र, मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करून ट्रक चालकाने तेथून पळ काढला. त्यामुळे माने व खाडे यांनी ट्रकमध्ये बसणाऱ्या मुलांना ‘तुम्ही कोठून आलात?’ याबाबत चौकशी केली.
यावेळी मुलांनी आम्ही बिहारहून आल्याचे सांगितले. कोठे जाणार आहात हे विचारले असता त्या मुलांकडे उत्तर नव्हते. पण त्यांच्या म्होरक्याकडे पश्चिम बंगाल येथील हावडा जंक्शन ते महाराष्ट्रातील पुणे जंक्शनपर्यंतचे रेल्वे तिकीटे होती. त्याने ही सर्व मुले आजरा येथील एका मदरशात धर्माचे शिक्षण घेत असल्याचे सांगितले. तसेच ईदला सुट्टीनिमित्त ही सर्व मुले गावी गेलेली होती. आज ती परत आली असून, पुढील शिक्षण घेण्यासाठी पुन्हा आजाराला निघाली असल्याचे सांगितले.