
उदगांव (ता.शिरोळ) येथील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील टोल नाक्याजवळ सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीने चक्का जाम आंदोलन केले. मादनाईक पुढे म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करत ऊस दराची मागणी करत आहोत.
जयसिंगपूर : “कारखानदार शेतकऱ्यांचे नुकसान करत असून अजून एक महिना आंदोलन करण्याची तयारी शेतकर्यांची आहे. राजू शेट्टी सांगतील त्या पद्धतीने आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असून सरकारला जाग आणण्यासाठी हा चक्काजाम आंदोलन केले आहे. मागील उसाचे पैसे न दिल्यास एक कांडेही ऊस तोडू देणार नसल्याचे सांगत आवाडे जर म्हणत असतील मागील उसाचे एक रुपये देणार नाही तर त्यांनी पुढील हंगामात ऊस गाळप करून दाखवावाच”, असा इशारा स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक यांनी दिला.
उदगांव (ता.शिरोळ) येथील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील टोल नाक्याजवळ सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीने चक्का जाम आंदोलन केले. मादनाईक पुढे म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करत ऊस दराची मागणी करत आहोत. पदयात्रा काढली, ऊस परिषदेतून मागणी केली, ठिय्या आंदोलन केले, गावागावात जाऊन सभा घेतल्या मात्र शासन व कारखानदार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शासन व कारखानदार यांची गट्टी झाली असून शेतकर्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. मागील उसाचे चारशे रुपये न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळी दहा वाजाता उदगांव, कोथळी, दानोळी, चिंचवाड, अर्जुनवाड, जयसिंगपूर परीसरातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते उदगांव टोलनाक्यावर दाखल झाले. कारखानदार व सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करणयात आली. त्यानंतर राजगोंडा पाटील, सागर मादनाईक, शैलेश आडके, दिपक पाटील, रामचंद्र शिंदे यांच्यासह पदाधिकार्यांनी ४०० मिळण्यासाठी भाषणे केली. दरम्यान या चक्काजाम आंदोलनामुळे कोल्हापूर सांगली महामार्गावर सुमारे १० ते १२ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. यात १०० ते १५० अधिक एसटी बसेस अडकुन पडल्या होत्या. या आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
यावेळी अभय भिलवडे, सुनिता चौगुले, भारती मगदुम, रमेश मगदुम, प्रकाश बंडगर, जगनाथ पुजारी, जवाहर चौगुले, पंकज मगदुम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर यांच्यासह कर्मचारी दुपारपर्यत वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते.