स्वामींचा जीवनपट उलगडणार! अक्कलकोटमध्ये साकारणार १०८ फूट उंचीची मूर्ती

  अक्कलकोट : अक्कलकोट  येथील राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ३५ एकरात श्री स्वामी समर्थ दिव्य दर्शन प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी दिली. या प्रकल्पाद्वारे स्वामींचा जीवनपट उलगडणार आहे.

  नवीन राजवाडा प्रांगणात श्री स्वामी समर्थ दिव्य दर्शन प्रकल्प सादरीकरणाप्रसंगी ते बाेलत हाेते. प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमंत वृषालीराजे भोसले (सातारा) उपस्थित होत्या. सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली आणि मनोगत व्यक्त केले.
  यावेळी श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत छत्रपती वृषाली शिवाजी राजे भोसले,श्रीमंत गोपाळराजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज) उपस्थित होते.अक्कलकोट संस्थानचे मानकरी बाबासाहेब निंबाळकर, श्रीमंत गोपाळराजे पटवर्धन, भगवान रामपुरे, महेश नामपुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन धनश्री दामले (मुंबई) यांनी केले.

   पंचधातूच्या मूर्तीचे आकर्षण
  अक्कलकोटचे नाव जागतिक स्तरावर पोहोचावे आणि पर्यटन क्षेत्राला वाव मिळावा, यासाठी शहरालगत असलेल्या ऐतिहासिक राम तलावात महाराष्ट्रातील सर्वात उंच श्री स्वामी समर्थांची मूर्ती अक्कलकोट राजघराणे साकारणार आहे. १०८ फूट उंचीने तयार होणाऱ्या या पंचधातूच्या मूर्तीचे आकर्षण सर्वांनाच असणार आहे, अशी माहिती अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे
  भोसले (तिसरे) यांनी सांगितले.

   लोकसभागातून प्रकल्प राबविणार
  स्वामी समर्थाच्या या मूर्तीला आतून स्टीलचा आधार असणार आहे. त्याखाली वीस फुटी कमळाकृती आकाराचे फाउंडेशन पाच राहणार असून लोकसभागातून प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. याला साधारण दोन वर्षांचा कालावधी लागेल. या मूर्तीसोबत त्याच्या खाली दहा हजार स्क्वेअर फूट आणि २० फूट उंचीचा अष्टकोनी हॉल उभारण्यात येणार आहे. त्यात या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती दिली जाईल. ही मूर्ती प्रसिध्द शिल्पकार भगवान रामपुरे हे बनविणार असून त्याची तयारी आता सुरू झाली आहे.

  मूर्तीच्या रूपाने जीवन चरित्र
  पहिल्या टप्प्यात मूर्तीचे काम आणि दुसऱ्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन चरित्र मूर्तीच्या रूपाने त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरात गुफाच्या रुपात साकारण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग हे पंचधातूच्या मूर्तीतून साकारले जातील. त्यातून प्रेक्षकांना स्वामींचा जीवनपट उलगडणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प तलावाच्या मध्यभागी होणार आहे. टप्पाटप्प्याने हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे.