परीक्षेच्या तोंडावर वडिलांचे निधन, तरीही जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर ‘तिने’ मिळविले १०० टक्के गुण

दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर वडिलांचे आकस्मात निधन झाले. मात्र, आई व नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर या दुःखातून सावरलेल्या स्वरा दीपक टकले (Swara Takale) हिने १०० टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळविले.

    सातारा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर वडिलांचे आकस्मात निधन झाले. मात्र, आई व नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर या दुःखातून सावरलेल्या स्वरा दीपक टकले (Swara Takale) हिने १०० टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळविले. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील परशुराम शिंदे कन्या विद्यालयातील स्वराचे हे यश सर्वांना थक्क करणारे ठरले आहे.

    स्वरा हिचे वडील दीपक शशिकांत टकले हे सिव्हिल इंजिनियर होते. त्यांचा बांधकाम व्यवसाय होता. जानेवारी २०२२ मध्ये अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने टकले कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. स्वरा हिची दहावीची परीक्षा दीड महिन्यावर आली होती. त्यामुळे तिची आई दिव्या यांनी या दुःखातून सावरून स्वराला अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगून दहावी परीक्षेत चांगले गुण मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास सांगितले.

    स्वराने देखील वडिलांचे दुःख मनात ठेवून अभ्यासाकडे लक्ष दिले. दहावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यामध्ये स्वराने १०० टक्के गुण मिळविले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक यांनी स्वराचे अभिनंदन केले.

    दरम्यान, टी. के. टी. इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी पुणे यांच्यावतीने स्वरा टकले हिचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वरा हिने आपल्या यशाचे श्रेय आई, आजी, दिवंगत वडील व शाळेतील शिक्षकांना दिले आहे.