स्वारगेट पोलिसांची दुहेरी कारवाई; मोबाईल, दुचाकी तसेच दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांना पकडले

  पुणे : स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने दुहेरी कारवाई करून मोबाईल, दुचाकी तसेच दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांना पकडले आहे. पहिल्या कारवाईत पोलिसांनी पीएमपीची बॅटरी तसेच २९ मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्यासह अल्पवयीनला पकडले आहे. दोघांकडून ४ लाख ९० हजाराचे तब्बल २९ मोबाईल जप्त केले आहेत. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून त्यांनी मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. तर, दुसऱ्या कारवाईत पार्क केलेली दुचाकी चोरून त्या दुचाकीवरून राजगडमधील मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्यास पकडण्यात आले आहे.

  पहिल्या कारवाईत ज्ञानेश्वर शशिकांत रामटेके (वय २१,  अप्पर इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोनमाथ जाधव, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख यांच्या पथकाने केली आहे.
  सणस ग्राऊंड समोरील रोडवर पार्क केलेल्या पीएमपी बसची अज्ञात चोरट्यांनी बॅटरीच काढून नेत चोरी केली होती. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता.

  या गुन्ह्याचा तपास सुरू होता. तेव्हा पोलीस अंमलदार फिरोज शेख, दिपक खेंदाड, संदीप घुले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बॅटरी चोरणारे जेधे चौकातील अंडा भुर्जीच्या गाड्यावर थांबलेले आहेत त्यानूसार, पथकाने सापळा रचून ज्ञानेश्वर व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी बॅटरी चोरल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीत वापरलेले वाहन तसेच शहरातील विविध भागातून चोरलेले तब्बल २९ मोबाईल देखील जप्त केले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, त्यांनी आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याबाबत तपास करण्यात येत आहे.

  दानपेटी फोडणारे जेरबंद
  लॉककरून पार्क केलेली अॅक्टिव्हा दुचाकी अज्ञातांनी चोरली होती. तिचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड, अनिस शेख व रमेश चव्हाण यांच्या माहितीनुसार, पियुष गणेश भरम (वय २२, रा. आंबेगाव पठार) आणि विवेक उत्तम मोरे (वय २४, रा. कात्रज) यांना अटक केली आहे. त्यांनी दुचाकी चोरी केल्यानंतर राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी येथील वाघजाई मंदिरातील दान पेटी फोडून रोकड चोरल्याचे कबूली दिली. त्यांच्याकडून रोकड व दुचाकी जप्त केली आहे