Systems should work in alert mode to cope with rainy weather, review via video conference

मंत्रालयातून पालकमंत्री देसाई यांनी २५ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नैसर्गिक आपत्ती व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. पावसाळ्यात रोगराई पसरणार नाही, यासाठी नाल्यांची साफसफाई व आरोग्य केंद्रात आवश्यक तेवढा औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात गावांना ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात यावा.

    वाशीम : मान्सूनचे आगमन यावर्षी लवकर होत आहे. सामान्य माणसाला पावसाळ्याच्या दिवसात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पावसाळ्यात रोगराई पसरणार नाही, यासाठी नाल्यांची साफसफाई व आरोग्य केंद्रात आवश्यक तेवढा औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात गावांना ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात यावा. पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    मंत्रालयातून पालकमंत्री देसाई यांनी २५ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नैसर्गिक आपत्ती व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून या बैठकीला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी ठोंबरे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांचेसह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

    यावेळी देसाई म्हणाले की, शहरी भागातील जुन्या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात यावे. पावसाळ्याच्या दिवसात नागरी भागातील सांडपाण्याची भूमिगत व खुली गटारे ओव्हरफ्लो होऊन रोगराई पसरते. त्यामुळे, तातडीने गटारांची सफाई करण्यात यावी. पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या वादळामुळे वीज पुरवठा खंडित होतो. तो वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी वीज वितरण कंपनीची पथके तयार ठेवावीत. तहसील कार्यालयात कंट्रोल रूम त्वरित सुरू करून तेथे रात्रपाळीमध्ये तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या सेवा घ्याव्यात. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सार्वजनिक प्रसिद्ध करावे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना अडचणीच्या प्रसंगी त्यांना संपर्क साधता येईल, असे त्यांनी सांगितले. ज्या तीन गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडतो त्या गावांना आवश्यक तेवढे धान्य आताच उपलब्ध करून द्यावेत, असे सांगून देसाई म्हणाले.

    ६० टक्के नालेसफाईची कामे करण्यात आली

    जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होणारी स्थिती नसली तरी, आपण तयारी केली असून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. नदीकाठावरील गावांच्या उपाययोजनेसाठी प्रशासन सज्ज आहे. बचाव पथकाकडे आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असल्याची खात्री केली आहे. वाशिम व कारंजा नगरपालिका क्षेत्रातील जीर्ण झालेल्या धोकादायक वेशीच्या परिसरात अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येईल. नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील ६० टक्के नालेसफाईची कामे करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू नये, यासाठी ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन म्हणाले.