बांगलादेशी नागरिकांना सहारा देणाऱ्यांवर कारवाई करा; नारायणगाव पोलीस ठाण्यात ग्रामस्थांची तक्रार

नुकतेच नारायणगाव येथे पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांना सहारा तथा आसरा कोणी दिला अशा आशयाचे निवेदन नारायणगाव ग्रामस्थांनी आज (१७ डिसेंबर) रोजी पोलीस स्टेशनमध्ये दिले.

    नारायणगाव : नुकतेच नारायणगाव येथे पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांना सहारा तथा आसरा कोणी दिला अशा आशयाचे निवेदन नारायणगाव ग्रामस्थांनी आज (१७ डिसेंबर) रोजी पोलीस स्टेशनमध्ये दिले. दरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी नारायणगाव येथील मुक्ताई मंदिरात ग्रामसभा देखील आज सकाळी भरवण्यात आली होती.

    दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करून अनाधिकृत राहत असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना नुकतेच ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार झाला आहे. त्यामुळे नारायणगाव सुरक्षित आहे का? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होऊ लागली आहे. दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर नारायणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये बेकायदा राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी नारायणगाव येथे कॅम्प चालू असताना सरपंच यांचा दाखला घेऊन आधार कार्ड बनविले असल्याचे नमूद करण्यात आले असून, बांगलादेश ते भारत प्रवास करताना त्यांच्याकडे कुठलेही प्रवासी कागदपत्र नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घुसखोर बांगलादेशी असून अवैधरित्या नारायणगाव येथे वास्तव्य करीत असल्याचे लक्षात आले आहे.

    दहशतवादी विरोधी पथकाने नारायणगाव पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील संपूर्ण तपासाची कारवाई नारायणगाव पोलिसांना करायची असल्याने येथील ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उप निरीक्षक विनोद धुर्वे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरातील वास्तव्यास असणाऱ्या परदेशी नागरिकांचा तपास करून त्यांना दिलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बोगस प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ बेकायदा व बोगस दिले असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण कागदपत्र कोणत्या कार्यालयामार्फत दिली गेली याचा शोध घेऊन संबंधित कृत्य करणाऱ्या व्यक्ती, पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून नारायणगाव भयमुक्त करावे असे निवेदनात म्हटले आहे.