
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून, राज्यभरातून त्यांना वाढता पाठिंबा आहे. राज्य सरकारने वेळीच याबाबतीत निर्णय घ्यावा अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
कोरेगाव : मराठा आरक्षण हा सर्वसामान्यांची निगडीत असलेला जिव्हाळ्याचा विषय असून राज्य सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून, राज्यभरातून त्यांना वाढता पाठिंबा आहे. राज्य सरकारने वेळीच याबाबतीत निर्णय घ्यावा अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली राज्यात सर्व प्रथम मराठा आरक्षणाची हाक दिली होती. त्यांनी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये बलिदान दिले होते, हे बलिदान विसरता येणार नाही. राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी शुक्रवारी मुंबई बाजार समिती आवारात माथाडी कामगारांनी एकत्रित येऊन कामबंद आंदोलन केले. केवळ पोलिसांच्या विनंतीवरून फळबाजार आणि भाजीपाला बाजार सुरू ठेवण्यात आला होता. माथाडी कामगार जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरतो, तेव्हा संपूर्ण राज्य थांबते हे कालच्या आंदोलनातून सरकारला दाखवून दिले असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
३० दिवसांची मुदत वाढवून ४१ दिवसांवर नेण्यात आली. मुदत संपल्यानंतर पुन्हा हे साखळी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उभे राहत आहे. त्यामुळे नेहमीच आग्रही असलेली आमची माथाडी कामगार संघटना परत या मागणीसाठी आग्रही राहिली आहे. या सर्व बाबींवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवस संप करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला होता.
मनोज जरांगे पाटील व मराठा तरुणांच्या भवितव्यासाठी मराठा आरक्षणाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करण्याची ताकद ही माथाडी कामगार आणि माथाडी संघटनामध्ये आहे, असा इशारा राज्य सरकारला दिला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारला जाब विचारणार
मराठा आरक्षणाचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा असून, राज्य सरकार जाणीवपूर्वक त्याबाबत निर्णय घेण्यात वेळकाढू पणा करत आहे, याविषयी आम्ही जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे विधानसभा, विधान परिषद आणि रस्त्यावर देखील सरकारला जाब विचारणार आहोत, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
प्रत्येक वेळी आंदोलनाची भूमिका
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. स्वर्गीय आमदार आण्णासाहेब पाटील स्वतः आणि त्यांच्यानंतर माथाडी संघटना १९८० सालापासून आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे राहिले, त्या प्रत्येक वेळी आंदोलन करण्याची भूमिका माथाडी कामगारांनी आणि संघटनांनी बजावली आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.