राज्यपाल कोश्यारींविरोधात महाभियोगाची कार्यवाही करा, उच्च न्यायालयात याचिका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदभार स्विकारल्यापासून नेहमीच वादग्रस्त विधाने आणि निर्णयाबाबत चर्चेत असतानाच त्यांनी नुकतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. यापूर्वीही त्यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आदी नेत्यासह महाराष्टासंदर्भातही वादग्रस्त विधान करून या महापुरूषांचा अवमान केला आहे.

     

    मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसह सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आदी मान्यवराच्याविरोधात आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्यामुळे वादात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाभियोगाची कार्यवाही (पदावरून हटवा) करणारी फौजदारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. दीपक दिलीप जगदेव यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदभार स्विकारल्यापासून नेहमीच वादग्रस्त विधाने आणि निर्णयाबाबत चर्चेत असतानाच त्यांनी नुकतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. यापूर्वीही त्यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आदी नेत्यासह महाराष्टासंदर्भातही वादग्रस्त विधान करून या महापुरूषांचा अवमान केला आहे. असा ठपका ठेवून या वादग्रस्त विधांनामुळे राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवली असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६१ आणि १५६ अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करावी. तसेच पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करून महाराष्ट्रात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी लोकांना चिथावणी खोर वक्तव्य केल्या प्रकरणी कलम १५३, १२४ अ अन्वये फौजदारी कारवाई करून त्या आदेशाची प्रत लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षांना द्यावी अशी विनंती याचिकेत केली आहे.