पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर उपाययोजना आवश्यक : भैय्या माने

अतिवृष्टीमुळे कागल शहरासह तालुक्यात अनेक भागात पूर परिस्थिती (Flood Situation) तयार होत आहे. गेल्या दोन वर्षाप्रमाणेच याहीवर्षी पूर परिस्थिती होण्याची शक्यता आहे. म्हणून शासकीय पातळीवर याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी केले.

  कागल / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अतिवृष्टीमुळे कागल शहरासह तालुक्यात अनेक भागात पूर परिस्थिती (Flood Situation) तयार होत आहे. गेल्या दोन वर्षाप्रमाणेच याहीवर्षी पूर परिस्थिती होण्याची शक्यता आहे. म्हणून शासकीय पातळीवर याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी केले.

  येथील तहसीलदार कार्यालयात पूर परिस्थितीच्या उपायोजनाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत माने बोलत होते. ते म्हणाले, दोन वर्षांमध्ये कागल तालुक्यात पुराचे मोठे संकट आले होते. त्यावेळी विविध संघटनांनी पूरबाधितांना मानवतेच्या भूमिकेतून मदत केली होती. यावर्षीही तशी परिस्थिती निर्माण होत आहे. यासाठी प्रशासन पातळीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. गेल्या वर्षी पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा स्थलांतरित भत्ता अद्याप मिळालेला नाही. देण्याची व्यवस्था करावी.

  माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी सध्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रशासकीय कार्यालयातील सर्वर बंद असल्याने विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक दाखले मिळत नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये मुलांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत गांभीर्याने विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले.

  तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, कर्मचाऱ्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिथे पूरपरिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणचे दौरे आम्ही केले आहेत. अशा स्थितीत नागरिक, जनावरे यांना निवारा, जेवण, वीज याची सोय करणे आवश्यक आहे. पुरामुळे ज्या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त होते, अशा ११ गावांसाठी सुविधा देण्यात येतील.

  प्रशासन अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणारच आहे. मात्र, पूरबाधित क्षेत्रात सामाजिक संघटनांनी जेवणाची व्यवस्था करावी, असे आवाहन करुन सर्वर सुरू झाला आहे. सर्वांना दाखले दिले जातील. कोणाचेही नुकसान केले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

  यावेळी सुनील माने, संजय चितारी, नितीन दिंडे, संजय ठाणेकर, ॲड. संग्राम गुरव, इरफान मुजावर, सुनील कदम, शहानूर पखाली, सतीश घाडगे, विवेक लोटे, युवराज लोहार उपस्थित होते.