डंपर चालक व मालकावर कडक कारवाई करा; आरपीआयचे निवेदन

वाई पोलीस व महसूल विभागाने सुसाट धावणाऱ्या डंपर चालक व मालकांवर कारवाई करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

    वाई : सुसाट धावणाऱ्या डंपरमुळे वाई परिसरात अनेक मोठे अपघात झाले असून यामध्ये अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे. तर अनेक जण कायमची जायबंदी झाले आहेत. कसलीही परवा न करता हे डंपर चालक सुसाट धावत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. वाई पोलीस व महसूल विभागाने सुसाट धावणाऱ्या डंपर चालक व मालकांवर कारवाई करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

    आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज वाई पोलीस व महसूल विभागांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काही महिन्यापासून वाई व पाचगणी परिसरामध्ये डंपर (वाळू व खडी वाहतूक करणारे वाहन) या मुळे अनेक अपघात झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी गांधी पेट्रोल पंपा शेजारी झालेला अपघात हे त्याचे जिवंत उदहारण आहे. भरधाव वेगाने पाचगणी वरून येत असणाऱ्या टँकरने वाई मधील एक ज्येष्ठ विचारवंत शामराव सहदेव कांबळे यांना आपला जीव गमावावा लागला. व इतर दोन १२ वर्षांची शाळकरी मुलं गंभीर जखमी झाली आहेत. वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या मालिकांमुळे हजारो वाईकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

    आपल्या विभागाकडून रोड रोमिओ, ट्रिपल सीट दुचाकी स्वार वाहक, नो पार्किंग मधील वाहनं, लायसेन्स नसणारे वाहन धारक यांच्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही होत असताना कायम निदर्शनास येत आहे, मात्र अशाचं पद्धतीची कारवाई डंपर चालकांवर होताना दिसत नाही. कारण आपल्या विभागाचा धाक डंपर चालकांवर नाही, हे त्यांच्या चालवण्याच्या पद्धतीवरून स्पष्ट दिसते. अशा वाहन धारकांवर कठोर कार्यवाही ही वाई व पाचगणी परिसरातील नागरिकांना अपेक्षित मागणी आहे. डंपर चालक याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का किंवा तो दारू पिलेला आहे का याची सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे गांधी पेट्रोल पंप शेजारी झालेल्या अपघातातील चालक दशरथ दत्तात्रय पवार याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे