यंत्रणा हाताशी धरून विरोधकांवर कारवाई सुरू; सुषमा अंधारे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका

यंत्रणा हाताशी धरून विरोधकांवर कारवाई सुरू केली आहे, असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केला.

  पाटस : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ला महाराष्ट्रात दोन टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे स्पष्ट चित्र दिसले असून तसा गोपीनीय अहवाल आल्यानंतर ते बिथरले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा स्वायत्त यंत्रणेचा गैरवापर सुरू केला आहे. ही यंत्रणा हाताशी धरून विरोधकांवर कारवाई सुरू केली आहे, असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केला.

  बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी ( दि ३०) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रचारसभा पार पडली. याप्रसंगी अप्पासाहेब पवार, रामभाऊ टूले, शरद सूर्यवंशी, अनिल सोनवणे, सचिन खरात, हरेश ओझा, आबासाहेब वाघमारे, भारत सरोदे, रवींद्र जाधव, मनिषा सोनवणे, नीना जोसेफ, सचिन काळभोर, अजित शितोळे आदींसह मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

  यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या ज्येष्ठ नेते शरद पवार हयात असताना त्यांचा भटकती आत्मा असा उल्लेख करीत असतील तर त्या सभेला उपस्थित असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते कसे ऐकून घेतले? ज्यांच्यासोबत अनेक वर्षे राहिले, अंगाखांद्यावर खेळले, त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद, मंत्री पद दिले, ज्यांनी बोट धरून शाळेत सोडले असेल त्या शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले जात असताना अजित पवार शांत राहिले. शरद पवार यांचा विश्वास राखू न शकणारे अजित पवार हे तर आम्हाला कधी पण बुडवायला तयार आहेत, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

  पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, भटकती आत्मा कोणाची आहे ? व नरेंद्र मोदी कुठे – कुठे भटकून आले आणि त्याची फलश्रूती काय आहे, हे देखील सांगायला हवे. महाराष्ट्रात आमचे आरोप – प्रत्यारोप चालतील आणि निवडणुकीत आमचं जे व्हायचे ते होऊ द्या. पण बाहेरचा कोणी येऊन आमची अस्मिता आणि प्रेरणास्थानाबद्दल अपशब्द काढत असेल तर महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांचा नाद पूरा केल्याशिवाय राहणार नाही. असंही अंधारे म्हणाल्या.

  भाजपने ज्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षाची उमेदवारी देऊन लोकसभेच्या निवडणुकात उभे केले. भाजप ही भ्रष्टाचारी आमदार खासदार आणि मंत्री गोळा करणारी डसबीन आहे. भाजप विरोधकांवर मात्र सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) धाडी टाकून त्यांना आपल्या पक्षात घेत आहे. निवडणुकीत मतदारांनी खोके घेणारे, पक्ष फोडणारे आणि कारवाईला घाबरून पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांना नाकारावे आणि स्वाभिमानी उमेदवारांना निवडून द्यावे. असे आवाहन अंधारे यांनी केले.

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही चाणक्य नाहीत, कारण त्यांनी कोणा नेत्याला घडविले तर नाहीच पण दुसऱ्यांचे नेते मात्र चोरले. अशी टीका अंधारे यांनी केली. भारताची लोकशाही धोक्यात असून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संसदेत पाठवण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले.