साताऱ्यात धक्कातंत्र?, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा; जयंत पाटलांशी गुफ्तगू!

सातारच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मनधरणी करण्यात येत आहे. त्यासंदर्भात रविवारी पृथ्वीराज चव्हाणांची राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली.

  कराड : सातारच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मनधरणी करण्यात येत आहे. त्यासंदर्भात रविवारी पृथ्वीराज चव्हाणांची राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये सातारच्या जागेसाठी सुमारे तासभर कमराबंद चर्चा झाल्याचे समजते.

  लोकसभेच्या सातारा मतदारसंघात भाजपाचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील या दोन खासदारांमध्ये आणि संभाव्य उमेदवारांमध्ये गत खेपेपेक्षाही टोकदार संघर्ष होवून ही लढत सर्वदूर गाजण्याची चिन्हे होती. पण, आजारपणाचे कारण पुढे करीत श्रीनिवास पाटील यांनी अनपेक्षितपणे थेट माघारच घेतल्याने राजकीय पटलावर खळबळ उडाली.

  पवार गटातील मतभिन्नतेमुळेच अखेर श्रीनिवास पाटलांनी ही निवडणूक लढवण्याला रामराम ठोकल्याचे मानले जात आहे. ही बाब लोकांच्या जिव्हारी लागली असून, श्रीनिवास पाटील यांच्या चाहत्यांच्या मनात याची सल राहणार आहे. तर, दुसरीकडे उद्यनराजेंसमोर पवार गटाचा तगडा उमेदवार नसल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांचे नाव आपसूकपणे चर्चेत आले आहे.

  दरम्यान, जयंत पाटील यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या निवासस्थानी जाऊन दोघांमध्ये तासभर खलबते झाली. पृथ्वीराज चव्हाणांनी सातारची जागा लढवावी असा शरद पवारांचा सांगावा घेवून त्यासंदर्भात चर्चेसाठीच जयंत पाटील हे चव्हाणांच्या भेटीला आल्याचे सूत्रांनी सांगितले.

  पण, चव्हाण त्यास होकार देतील किंवा काय या अंगाने आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही नुकतीच चव्हाणांच्या उमेदवारीची जोरदार मागणी केल्याने सातार्‍याच्या उमेदवारीचा ही शक्यता अधिक गडद झाली होती. अशातच जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात बंदखोलीत तासभर चर्चा झाल्याने या शक्यतेला बळ मिळाले आहे.

  श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीला पाटणमधून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व त्यांचे पुत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह यांचा जाहीर विरोध होता. तर, कराड तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांचीही नाराजी होती. या सार्‍या तीव्र भावना खुद्द शरद पवार यांच्यासमोर व्यक्त झाल्या होत्या. श्रीनिवास पाटलांसह त्यांचे पुत्र सारंग यांनाही नाराज गटाने लक्ष्य केल्याचे समजते. सुरुवातीला हे नाराजीनाट्य असावे असे मानले गेले. परंतु, विरोधाची धार अगदीच वाढली.

  अशातच सातार्‍यात काल शुक्रवारी लोकसभेच्या सातारा मतदारसंघाच्या इतिहासात ठळकपणे नोंद राहील अशी घटना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवडणुकीतील माघारीतून घडली. पाटील यांनी आजारपणाचे कारण पुढे करीत निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून टाकले. त्यामुळे नेत्यांची नाराजी फळास गेली. पक्षाची चव्हाट्यावर आलेली मतभिन्नता दूर करण्यात शरद पवारांनाही यश आले नाही आणि सातार्‍यात पवार गटाचा उमेदवारीचा बट्याबोळ झाल्याचे बोलले जात आहे.

  खासदार उद्यनराजेंसमोर श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी तोडीस तोड असताना, अचानक सक्षम उमेदवारच बाजूला झाल्याने श्रीनिवास पाटील यांचे रिंगणातून बाजूला होणे शरद पवारांना पर्यायाने महाविकास आघाडीला परवडणारे आहे का? आता नवा चेहरा कोण? हा कळीचा मुद्दा आहे.

  दरम्यान, तूर्तास तरी पक्षाची सक्षमता दर्शवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याच नावाचा आग्रह धरला. पवारांनी ही बाब समजून घेत दोन-तीन दिवसात उमेदवार जाहीर करू असे स्पष्ट केले आहे. पवार गटातून राज्याचे माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची नावे चर्चेत आहेत.

  महाविकास आघाडी स्तरावर विचार करता सातारची जागा राखण्यासाठी औटघटकेला प्रबळ उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गळ घालण्यात येईल पण, ते त्यास होकार देतील किंवा काय या अंगानेही राजकीय वर्तुळात चर्चा होती. विशेष म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही नुकतीच चव्हाणांच्या उमेदवारीची जोरदार मागणी केल्याने सातार्‍याच्या उमेदवारीचे हे वेगळे वळणही चर्चेत होते. तर, जयंत पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील गोपनीय चर्चेने खळबळ उडताना, हा उद्यनराजेंच्या उमेदवारीला चव्हाणांचा पर्याय अडचणींचा असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

  इंडिया आघाडीच्या मेळाव्या दरम्यान, माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा मतदार संघात कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी विचाराचा खासदार नको यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मी आणि शरद पवारांमध्ये तीन चार तास चर्चा झाली. सातार्‍याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून, सध्या अतिशय प्रबळ उमेदवारच हवा म्हणून इंडिया आघाडीच्या सर्वांचे प्रयत्न असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.