सिडकोच्या डम्पिंगवर रासायनिक कचरा, पालिकेच्या वाहणातून केली जात होती रासायनिक कचऱ्याची वाहतूक

कारखान्यामध्ये तयार होणारा इतर प्रकारचा कचरा मात्र पालिका स्वीकारत नसल्याने अनेक कारखानदार या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली लढवत असतात.

    पनवेल, ग्रामीण – तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सिडकोच्या शेपण भूमीत (डम्पिंग ग्राउंड) रासायनिक कचरा टाकण्याचा डाव प्रभाग अधिकाऱ्यांच्या हुशारीने उधळण्यात आला. महत्वाचे म्हणजे पनवेल पालिकेच्या वाहनातून हा रासायनिक कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये आणण्यात आला होता. पनवेल पालिके मार्फत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कचरा गोळा करण्याचे काम केले जाते. पालिकेच्या वाहणातून गोळा करण्यात येत असलेल्या कचऱ्यात किचन वेस्टचा समावेश असतो, कारखान्यामध्ये तयार होणारा इतर प्रकारचा कचरा मात्र पालिका स्वीकारत नसल्याने अनेक कारखानदार या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली लढवत असतात.

    मंगळवारी (ता.26) देखील पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्या बाहेर ठेवण्यात आलेला कचरा उचलून पालिकेच्या वाहणात टाकला. तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या शेपण भूमीत पोहचल्यावर वाहनांमधून टाकण्यात आलेला कचरा रासायनिक असल्याचे लक्षात येताच ज्या कारखान्या बाहेर हा कचरा ठेवण्यात आला होता त्या कारखान्यावर हा कचरा परत पाठवण्यात आला असल्याची माहिती प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी दिली आहे.

    रासायनिक कचरा गोणीमध्ये भरून कारखान्या बाहेर का ठेवला असा जाब पालिका अधिकाऱ्यांनी विचारला असता, गोणीत भरून ठेवण्यात आलेला रासायनिक कचरा उचलण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरं वाहन येणार असल्याने हा कचरा बाहेर ठेवण्यात आल्याचे आणि पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तो कचरा पालिकेच्या वाहणात टाकल्याचे सांगत कारखानदाराने हात झटकले आहेत.