उघड्या दरवाजावाटे चोरी करणाऱ्या तामिळनाडूतील टोळीला बेड्या; 60 मोबाईलसह 14 लॅपटॉप जप्त

सकाळच्या वेळी दरवाजा उघडा असलेल्या घरातून मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधील एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 14 लाख 30 हजार रुपये किमतीचे 60 मोबाईल फोन आणि 14 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

  पिंपरी : सकाळच्या वेळी दरवाजा उघडा असलेल्या घरातून मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधील एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 14 लाख 30 हजार रुपये किमतीचे 60 मोबाईल फोन आणि 14 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड, निगडी, चिंचवड, चिखली, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 23 गुन्ह्यांची उकल झालीआहे.

  सौंदराजन गोविंदन (21, रा. तामिळनाडू), गुनासेकर शंकर (21), तामीलारसन सुखवानीबाग (रा. भोसरी. मूळ रा. तामिळनाडू) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप, मोबाईल फोन चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. त्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक गणेश जवदवाड, निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने काम सुरु केले. वाकड पोलीस गस्त घालत असताना त्यांना उघड्या दरवाजावाटे चोरी करणारा एक संशयित आरोपी सापडला. त्याच्याकडे चौकशी करत वाकड पोलिसांनी त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक केली.

  …म्हणून त्यांनी सोडले घर

  तामिळनाडू येथून चोऱ्या करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आलेले आरोपी चोरीच्या कामासाठी सकाळच्या वेळी घराबाहेर पडत. ठरलेल्या वेळेत जर साथीदार घरी परत आला नाही तर अन्य साथीदार चोरीचे सामान घेऊन आपला ठावठिकाणा बदलत असत. वाकड पोलिसांनी सौंदराजन याला ताब्यात घेतले. तो वेळेत परत न आल्याने त्याच्या इतर दोन साथीदारांनी घर सोडले होते. ते आरोपी ट्रॅव्हल्सने कर्नाटक मार्गे तामिळनाडू येथे मूळ गावी जात असताना वाकड पोलिसांनी त्यांना खंबाटकी घाट सातारा येथून ताब्यात घेतले.

  14 लाखांचा मुद्देमाल जप्त

  या कारवाई मध्ये वाकड पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहर आणि तामिळनाडू येथून तब्बल 60 मोबाईल फोन आणि 14 लॅपटॉप सह रोख रक्कम असा एकूण 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील 11, निगडी, चिखली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी तीन, चाकण चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, भोसरी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 23 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींनी या सर्व चोऱ्या एकाच महिन्यात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

  तपासात पोलिसांना अडचणी

  वाकड पोलिसांनी सुरुवातीला सौंदराजन या आरोपीला अटक केली. त्याला केवळ तामिळ भाषा येत होती. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधत इतर माहिती घेण्यासाठी वाकड पोलिसांना भाषेच्या अडचणी आल्या. दरम्यान पोलीस अंमलदार सतीश पिल्लामारी यांना तामिळ भाषा येत असल्याने त्यांना तपास पथकात घेत त्यांच्या मार्फत पुढील चौकशी करण्यात आली.

  ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखेंसह इतर अनेकांनी केली आहे.