उस्मानाबादच्या आमदाराच्या दाव्याबाबत तानाजी सावंत म्हणाले; ‘कैलास पाटील डबलढोलकी असणारे आमदार’

उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली, असे स्पष्टीकरण माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिले.

  कळंब : उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली, असे स्पष्टीकरण माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिले. तसेच कैलास पाटील डबलढोलकी असणारे आमदार, असेही ते म्हणाले.

  कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदे गटातून कसा काढता पाय घेतला याचं कथन माध्यमांसमोर केलं होतं. त्यावर तानाजी सावंत म्हणाले, कैलास पाटील हा मला भीती वाटत आहे. मी माघारी जाईन. तेव्हा मे त्याला माझी गाडी घेऊन जा. असं म्हटल होतं. त्यावेळी त्याने ‘नको सर, मी जातो’, असं म्हटल होतं. पण आता तो दिशाभूल करतोय. जेव्हा प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा त्याचा दावा साफ खोटा आहे.

  सावंत पुढे म्हणाले, आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून ‘मातोश्री’ची व आमदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत. हे दुर्दैवी आहे. ते माध्यमांची दिशाभूल करताहेत. डबलढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुख यांनी देखील सावध राहावं, असंही ते म्हणाले.

  काय म्हणाले होते कैलास पाटील…

  एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर विधानपरिषदेचे मतदान झाल्यानंतर मला आणि माझ्या सहकाऱ्यांना बोलावलं गेलं. आम्ही गेलो तिथे, त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की, आपल्याला जायचं आहे, एकनाथ शिंदे तिथे आपल्याला भेटणार आहेत. तिथून आम्हाला ठाण्याच्या महापौर बंगल्यावर नेण्यात आलं. तिथे आम्हाला सांगितलं साहेब पुढे आहेत, तिथून आमची गाडी बदलण्यात आली.

  महापौर बंगल्यातून गाड्या निघाल्या. पण ठाणे, वसई, विरार गेलं, त्यानंतर माझ्या मनात थोडा संशय आला. शहर संपत गेली. ज्यावेळेस या गाड्या बॉर्डर चेकपोस्टवर आल्या. त्यावेळेस मला समजलं काही तरी वेगळं घडतंय. चेकपोस्टवर नाकाबंदी होती. त्यांच्या स्टाफमधल्या एका माणसाने आम्हाला सांगितलं नाकाबंदी आहे. तुम्ही थोडं चालत पुढे या, त्या संधीचा फायदा घेत मी खाली उतरलो. त्यानंतर मुंबईच्या दिशेने जो रस्ता आहे त्या दिशेने चालत निघालो.