टार्गेट ठाकरे कुटुंब, उद्धव ठाकरेंना 19 बंगल्यांप्रकरणी तर आदित्यंवर गंभीर आरोप, बीएमसी निवडणूक प्रचारासाठी शिंदे गट-भाजपची रणनीती?

मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे कुटुंबाना टार्गेट करायचे आणि त्यांचे खच्चीकरण करायचे, त्यामुळं त्याचा परिणाम मुंबईकरांवर पर्यायान मतांवर होईल, अशी रणनिती भाजपा-शिंदे गटाकडून आखण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

    मुंबई : सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे, या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक ऐकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत, तर मुंबई पालिका निवडणुकीच्या धरतीवर ठाकरे कुटंबाना लक्ष्य केलं जात असून, शिंदे गट-भाजपची ही रणनीती असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत तसेच दिशा सालियान या दोघांची हत्या नसून, आत्महत्या होती असं सीबीआयनं अहवालात म्हटलं आहे. यानंतर या प्रकरणावर पूर्णविराम मिळाला होता, पण काल लोकसभेत पुन्हा एकदा खासदार राहुल शेवाळेंनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

    दरम्यान, शेवाळेंच्या मागणीनंतर यावर चर्चा होत आहे. सुशांतसिंग तसेच दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राणे कुटुंबानंतर आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलंय. रिया चक्रवतीच्या मोबाईलमध्ये AU असा उल्लेख आढळला आहे, म्हणजे आदित्य उद्धव त्यामुळं याचा तपास व्हावा, अशी मागणी लोकसभत शेवाळेंनी केली आहे. यानंतर याचे पडसाद काल हिवाळी अधिवेशनात देखील पाहयला मिळाले. तर दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, असं आमदार नितेश राणेंनी मागणी केली आहे.

    तर दुसरीकडे उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या पत्नीचे अलीबागमध्ये 19 अनाधिकृत बंगल्यांप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. हे सर्व बंगले अनाधिकृत असून यावर हातोडा पडावा, हे सर्व बंगले तोडण्यात यावे अशी मागणी भाजपाने व शिंदे गटाने केली आहे. दरम्यान, मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे कुटुंबाना टार्गेट करायचे आणि त्यांचे खच्चीकरण करायचे, त्यामुळं त्याचा परिणाम मुंबईकरांवर पर्यायान मतांवर होईल, अशी रणनिती भाजपा-शिंदे गटाकडून आखण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ठाकरे कुटुंबावर आरोप करत मुंबई पालिका निवडणुकीत प्रचार करायचा आणि मुंबईकरांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सध्या शिंदे गट-भाजपाकडून दिसत आहे.