तासगावचा बाजार बेमुदत बंद! प्रशासनाच्या आवाहना विरोधात व्यापरी व शेतकरी एकवटले 

 तासगाव नगर परिषदेने श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आणि याठिकाणीच प्रशस्त  भाजी मार्केट सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करून उभारले आहे. या व्यापारी संकुलात भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र गाळे तयार आहेत.

    तासगाव : तासगाव नगर परिषदेने (Tasgaon Nagar Parishad) श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आणि याठिकाणीच प्रशस्त  भाजी मार्केट सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करून उभारले आहे. या व्यापारी संकुलात भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र गाळे तयार आहेत. तासगाव पालिकेने (Tasgaon Palika)या ठिकाणी सोडत काढून व्यापाऱ्यांना गाळ्यांचे वाटपही केले आहे. वाटप झाल्यानंतर काही वर्षे या ठिकाणी सर्वच व्यापारी बसले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून पुन्हा हे सर्व व्यापारी बागणे चौक ते सोमवार पेठ,बागवान चौक या ठिकाणी पुन्हा बसायला लागले आहेत.
    दरम्यान,दोन दिवसापूर्वी प्रशासनाने शहरातील सर्व फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते यांना दैनंदिन बाजार, व गुरुवारचा आठवडी बाजार हा छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल मध्ये स्थलांतरित केला असून सर्वांनी संकुलात बसण्याचे आवाहन केले.परंतु आता भाजी विक्रेते आणि शेतकरी बांधवानी रोजचा बसणारा बाजार हा बेमुदत बंद ठेऊन, संकुलात बसणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
     यावेळी भाजी विक्रेत्यांनी संकुलात बसल्यावर धंदा होत नसून, विक्रीसाठी आणलेला भाजीपाला शिल्लक राहून त्याचे नुकसान होत असल्याचे सांगितले. ज्यावेळी आम्ही संकुलात बसत होतो त्यावेळी शिल्लक राहिलेल्या भाजीपाल्यामुळे आमचे प्रचंड नुकसान होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन आम्ही सर्वच व्यापारी कर्ज बाजारी झालो असल्याचे सांगितले. तसेच आता ज्याठिकाणी बाजार बसवला जातो तो गावचा मध्य चौक असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे, तसेच अन्य व्यापार होत असून प्रशासनाने आमचा विचार करून आम्हाला न्याय देऊन आहे त्या जागीच त्यांचे जे नियम व अटी असतील त्या घालून आम्हाला जागा ठरवून द्यावी, त्याप्रमाणे आम्ही बसू,आम्ही प्रशासनाला सहकार्य करू, अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी बागवान चौकात जमा झाले होते.