तासगावातील ज्वेलर्स दुकानातील चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

तासगावातील अशोक अँन्ड सन्स ज्वेलर्स दुकानातील चोरीचा छडा लावण्यात अवघ्या बारा तासांत पोलिसांना यश आले आहे, तर चोरीस गेलेल्या सर्व दागिन्यांसह २ लाख, ७८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेश येथील ५ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.

  तासगाव : तासगावातील अशोक अँन्ड सन्स ज्वेलर्स दुकानातील चोरीचा छडा लावण्यात अवघ्या बारा तासांत पोलिसांना यश आले आहे, तर चोरीस गेलेल्या सर्व दागिन्यांसह २ लाख, ७८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेश येथील ५ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.

  मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक निवृत्ती जाधव, रा. बेणापूर, ता. खानापूर यांचे चिंचणी नाका, तासगाव येथे अशोका ॲन्ड सन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवार, १६ जानेवारी रोजी त्यांनी रात्री सातच्या दरम्यान दुकान बंद केले. १७ जानेवारी रोजी सकाळी फिर्यादी व त्यांचा मुलगा ज्वेलर्सचे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले.

  यावेळी चोरटयांनी या दुकानातून १ लाख ७६ हजार २५० रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी जाधव यांनी फिर्याद दिली होती. या चोरी प्रकरणी मोहीत चिघरजसिंग परिहार वय २५, राज मरत परिहार २२, जितु सुलतान कुशवाह २१, अमित प्रकाश परिहार २४, राजीव प्रेमसिंह परिहार-२४ सर्व रा. मध्यप्रदेश या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

  गुन्हे प्रकटीकरण पथक हुशारीने व कौशल्यपूर्ण तपास करत होते. त्यावेळी वरील पाच जणांनी त्यांच्याकडील टाटा कंपनीच्या ट्रकचा वापर करून हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सीसीटीव्हीसह इतर स्रोताव्दारे ट्रकची माहिती घेतली असता हा ट्रक या पाच संशयितांसह धुळे येथे असल्याबाबत व तो मध्यप्रदेशच्या दिशेने जात असल्याबाबत माहिती मिळाली होती.

  पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक आगरकर यांना माहिती देऊन संशयितांना ताब्यात घेण्याबाबत सूचना केली. तेथील गुन्हे प्रकटीकरणाने वरील पाचही संशयितांना ट्रकसह ताब्यात घेतले.

  उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगाव सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ सहा. पोलीस निरीक्षक रोहीत शिंदे, अमोल चव्हाण, पोलीस हवालदार अमरसिंह सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, पोलीस नाईक समीर आवळे, विवेक यादव, व कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील यांनी कारवाई केली.