tata sons and nitin gadkari

टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं टाटा सन्सचे (Tata Sons) अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पत्र पाठवून कळवलं आहे.

    नागपूर : टाटा समूहासंदर्भातील (Tata Group) एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं टाटा सन्सचे (Tata Sons) अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पत्र पाठवून कळवलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७ ऑक्टोबर रोजी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांना पत्र लिहिलं होतं. नागपुरातील मिहान सेझमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं गडकरींनी नटराज चंद्रशेखरन यांना सांगितलं होतं. त्या पत्राला नटराज चंद्रशेखर यांनी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे.

    मिहानमध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकोनॉमिक डेव्हलपमेंट काऊंसिल अर्थात वेदने एक आराखडा तयार केला आहे. याबाबतची माहिती गडकरींनी दिली होती. आता टाटा समूहाने नितीन गडकरी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये टाटा समूहाची टीम नागपूर मिहानमधील उद्योग विस्ताराच्या संदर्भात वेदच्या संपर्कात राहील असं कळवण्यात आलं आहे.

    टाटा समूहाचा मिहान मधील प्रस्तावित एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच टाटा समूहाकडून नागपूरच्या मिहान सेझमध्ये उत्सुकता दाखवणे ही एक सकारात्मक बाब आहे.

    टाटा समूहाचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्राबद्दल विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने समाधान व्यक्त केले आहे.