
मुंबई : रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरू करावी तसेच कंत्राटी भरती प्रक्रिया राबवू नये यासाठी एका व्यक्तीने मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उडी घेतल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांकडून अशा प्रकारे जाळीवर उड्या मारण्याचे प्रमाण वाढलं आहे.
पोलिसांनी घेतलं ताब्यात
शिक्षक भरती तात्काळ सुरु करावी तसेच कंत्राटी भरती तात्काळ बंद करावी यासाठी या व्यक्तीनं आंदोलन केलं. आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्यानंतर मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यांवर त्यानं उडी घेतली, तसेच घोषणाबाजीही केली. पोलिसांनी विनंती करुनही तो बाहेर येत नसल्यानं अखेर एका पोलिसानं स्वतः या जळीवर उडी घेत त्याला ताब्यात घेतलं.
सरकारनं काढला होता जीआर
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं कंत्राटी भरतीसाठीचा एक शासन निर्णय काढला होता. या निर्णयाला सर्व वर्गातून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोपही झाले होते. यापार्श्वभूमीवर या व्यक्तीनं उडी घेताना ही कंत्राटी भरती बंद करण्याची मागणी केली.
वारंवार घडताहेत घटना
यापूर्वी देखील एका शेतकऱ्यानं अशाच प्रकारे संरक्षण जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानं देखील या कृतीद्वारे सरकारसमोर आपल्या मागण्या ठेवत जाब विचारला होता. पण हे प्रकार वाढल्यानं मंत्रालयातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.