Teacher turns out to grab women's Mangalsutra; Shackles by Swargate Police

  पुणे : पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारा शिक्षकच निघाला असून, या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पाठलाग करुन अटक केली आहे. स्वारगेट परिसरात या अटकेचा थरार घडला आहे. एका महिलेने आरडा ओरडा केल्यानंतर त्याला पकडण्यात यश आले आहे.

  खडक पोलीस ठाण्यात तक्रार

  बाळू प्रकाश रणपिसे (वय ३२, रा. मु.पो.बोरगाव, ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत मंजुळा नारायण चिल्लाळ (वय ५९ रा. गुजरवाडी कात्रज) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे, वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, संजय जाधव, विनोद चव्हाण, नागनाथ राख व मोहसीन शेख यांच्या पथकाने केली आहे.

  महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली

  शहरात मोबाईल हिसकावण्यासोबतच महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याच्या घटनादेखील घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक दुपारी स्वारगेट एसटी स्टँड, पीएमटी बस स्टॉप या गर्दीच्या ठिकाण पेट्रोलींग करीत होते.

  मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पलायन

  दरम्यान, तक्रारदार महिला या स्वारगेट पोलीस ठाण्यासमोरुन घोरपडे पेठकडे पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या आरोपीने महिलेच्या गळ्यातील ६६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळून जाऊ लागला. महिलेने आरडाओरडा केला. त्यावेळी पेट्रोलिंग करीत असलेले पोलीस अंमलदार मोहसीन शेख व संजय जाधव यांनी आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडले.

  चौकशीत तो शिक्षक असल्याचे निष्पन्न

  त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो शिक्षक असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ट्रॅक पॅटच्या खिशात एक तुटलेले मंगळसुत्र मिळाले. महिलेने हे मंगळसूत्र ओळखून त्यांचेच असल्याचे सांगितल्याने पंचनामा करुन ते जप्त करण्यात आले आहे. आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.