‘सेल्फी विथ मिट्टी’ अभियानाने शिक्षक हैराण!  विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची माती; तांत्रिक कार्यक्रमात जातोय वेळ

देश पातळीवर प्रधानमंत्री यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान राबवले, हेच अभियान आता ‘मेरी मिट्टी मेरा अभिमान’ उपक्रमातंर्गत शिक्षण विभागाकडून 'सेल्फी विथ मिट्टी, अभियान राबविण्यात येत आहे, असल्याने जास्तीजास्त छायाचित्रे संकेतस्थळावर टाकण्यासाठी दिवसभर शिक्षकांना धडपड करावी लागत आहे.

  प्रवीण शिंदे, सांगली :  देश पातळीवर प्रधानमंत्री यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान राबवले, हेच अभियान आता ‘मेरी मिट्टी मेरा अभिमान’ उपक्रमातंर्गत शिक्षण विभागाकडून ‘सेल्फी विथ मिट्टी, अभियान राबविण्यात येत आहे, असल्याने जास्तीजास्त छायाचित्रे संकेतस्थळावर टाकण्यासाठी दिवसभर शिक्षकांना धडपड करावी लागत आहे.

  ‘मेरी मिट्टी मेरा देश’ मोहिमेतंर्गत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील माती अमृत कलशांच्या माध्यमातून राजपथावर नेण्यात आली असताना शिक्षण विभागाच्या ‘मेरी मिट्टी मेरा अभियान-सेल्फी विथ मिट्टी’ या उपक्रमाचा समारोप होत आहे. त्यामुळे प्रशासन आदेशानुसार खाली शाळांमध्ये सेल्फी काढून त्या गुगलड्रायव्हवर टाकून त्याच्या लिंक मागत आहे.

  सध्या सहामाही परीक्षेचा सुरू आहेत. महाविद्यालय स्तरावरही विविध प्रकल्प जमा करणे, परीक्षांचा काळ सुरू आहे. शाळा स्तरावर प्राथमिक विभागात मूल्यमापन संकलित चाचणीचा सावळा-गोंधळ निस्तरतांना मुख्यध्यापकांच्या नाकी नऊ आले आहे. सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या अनुषंगाने परीक्षा प्रलंबित आहेत. याशिवाय सहामाही परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. अशा स्थितीत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सेल्फी संकेतस्थळावर टाकण्यासाठी लागणारा वेळ हा शिक्षक व मुख्यध्यापक हैराण झाले आहेत. तर वेळ वाया जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची माती होत आहे.

  मुख्याध्यापक, शिक्षकांवर दबाव
  जास्तीत जास्त सेल्फी संकेतस्थळावर टाकाव्यात, यासाठी शिक्षण उपसंचालक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडून सातत्याने भ्रमणध्वनीवर दिवसभर सूचना येतात. मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर यासाठी दबाव आणण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

  शिक्षण यंत्रणेला विनाकारण त्रास
  शैक्षणिक स्पर्धा कमालीची वाढली आहे. आधीच जिल्हा परिषद शिक्षकांना अशैक्षणिक कामे वाढलेली असल्याने शिक्षकांना मुलांना शिकवायला वेळ कमी पडतो आहे. अशैक्षणिक कामे कमी की काय म्हणून ज्याचा काहीच उपयोग होणार नाही, असे उपक्रम राबवून शिक्षण यंत्रणेला विनाकारण त्रास दिला जातोय, विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान केले जात आहे.

  अमृत कलशाच्या माध्यमातून माती आधीच पाठविण्यात आली असल्याने या छायाचित्रांचे करणार काय ? , विद्यार्थ्यांनी मातीसोबत, मातीच्या ढिगाऱ्यासोबत तसेच काहींनी तर दगडासोबतही छायाचित्रे काढली आहेत. शिक्षकांनी वेळ वाचावा यासाठी समुह छायाचित्रे घेतली. परंतु, ती संकेतस्थळाने नाकारली.

  -महेश शरनाथे, शिक्षक नेते