अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; पंढरपूर तालुक्यात द्राक्ष, तूर, गहू, कांदा व हरभरा मातीमाेल

पंढरपूर, मोहोळ तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष, तुरीसह गहू, हरबरा, कांदा, कापूस, तूर, फळभाज्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान होऊन पिके मातीमोल झाली आहेत.

  पंढरपूर : पंढरपूर, मोहोळ तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष, तुरीसह गहू, हरबरा, कांदा, कापूस, तूर, फळभाज्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान होऊन पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

  दुष्काळाच्या सावटाखाली आधीच शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यातच अचानक अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसल्याने पिके होत्याची नव्हती झाली आहेत. तर वेचणीला आलेल्या कापसाच्या पूर्णतः वाती झाल्याने शेतकरी हताश झाला. तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले असताना थंडीने देखील जोर धरला आहे. त्यातच सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रात्री अचानक पावसाने तडाखा दिल्याने वेचणीला आलेला कापूस, कांदा, मिरची, गहू, हरभरा द्राक्ष आणि फुलाेऱ्यात आलेल्या तूर पिकांची माती झाली आहे. त्यामुळे आता पावसामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पुन्हा भंगले आहे.

  काही भागात सिंचनाची व्यवस्था असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची पूर्ण हंगामी लागवड केली होती. सोबतच कांदा लागवडीला पसंती दिली होती. ऑक्टोंबर, नोव्हेंबर उजाडल्याने शेतात कपाशी फुटली होती. कपाशीच्या पावसामुळे वाती होताना दिसत असून, फुटलेला कापूस पावसामुळे खाली पडून मातीत मिसळला आहे.

  बळीराजाच्या स्वप्नांचा वरवंटा

  रब्बी पिके जोमात होती. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामाचे स्वप्न शेतकरी रंगवित होता. मात्र त्याच्या या स्वप्नावर अवकाळी पावसाने वरवंटा फिरविला. गेली चार वर्षे दुष्काळावर मात करताना कर्जबाजारी व प्रसंगी सोने बँक, खासगी सोनाराकडे घाण ठेवून आपला प्रपंच भागविणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने चांगलाच फटका बसला आहे..

  अवकाळी पावसाने शेतातील पिकांना तडाका बसल्याने द्राक्ष गहू, हरभरा, कांदा तूर भाजीपाल्याची नुकसान झाले आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांना सकट पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी.

  - राजू खरे, शिवसेना शिंदे गट.