वस्ताद येतोय आपल्या भेटीला…! शरद पवार यांच्या पुण्यातील सभेचा टीझर आऊट

सभेचा टीझर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रिलीज करण्यात आलेला असून ‘वस्ताद येतोय भेटीला’ असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे.

    पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून कसून प्रचार केला जात आहे. सभा, बैठका आणि भेटीगाठी यांचे सत्र वाढले आहे. यावेळी पवार कुटुंबामध्येच लढत होणार असल्यामुळे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. शरद पवार यांची लवकरच यवतमध्ये सभा पार पडणार आहे. या सभेचा टीझर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रिलीज करण्यात आलेला असून ‘वस्ताद येतोय भेटीला’ असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे.

    ‘वस्ताद येतोय आपल्या भेटीला…’

    सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार गट जोरदार प्रचार करत आहे. रोहित पवार ऑफिस या ट्वीटर अकाऊंटवरुन शरद पवार यांची व्हिडिओ शेअर करण्यात आलेली आहे. टीझरची सुरूवातच शरद पवार यांच्या फोटोसोबत ‘वस्ताद येतोय आपल्या भेटीला…’ अशी करण्यात आलेली आहे. त्यानंतर टीझरमध्ये शरद पवार सभेमध्ये बोलताना दिसत आहे. ते बोलतात की, ‘माझी विनंती आहे त्यांना दमदाटीचे राजकारण या तिघांनी कधी केले नाही आणि जर कोणी केले तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल. त्याला सोडणार नाही. सरळ आहे तोपर्यंत सरळ. कोणी वाकडे पाऊल टाकले तर तो पाय काढणार.’, असा इशारा शरद पवार यांनी भाषणातून दिला आहे.

    माझा बाप माझी बुलंद कहाणी

    त्याचबरोबर टीझरमध्ये सुप्रिया सुळे व रोहित पवार यांची देखील भाषणं दाखवण्यात आली आहे. भाषणामधून खासदार सुऴे व आमदार पवार हे अजित पवार यांना टोला लगावताना दिसत आहे. भाषणामध्ये सुप्रिया सुळे म्हणत आहेत की, ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी.’ तसंच त्या पुढे म्हणतात की, ‘सत्ता-सत्ता काय फक्त ५० खोके एकदम ओकेसाठी नाहीये.’ तर या टीझरमध्ये रोहित पवार देखील एका सभेदरम्यान बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात की, ‘आणि सहज तुम्ही सत्तेसाठी लोकांना सोडून गेला. कुटुंब आणि पार्टी फोडून इलेक्शन लढणे हे लोकांना पटत नाही. लोकांसाठी विचार महत्वाचे आहेत. असा टोला अजित पवार यांना लगावलेला आहे. येत्या 15 एप्रिल रोजी होणाऱ्या पुण्यातील शरद पवार यांच्या सभेकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.