तहसीलदारांचा पडळकरांना दणका; वादग्रस्त जागेवर मिळकतधारकांचा कब्जा निश्चित

मिरजेतील (Miraj) वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने (Dukan) पाडल्याप्रकरणी जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar ) यांना तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दणका दिला. जागेवरील मिळकतधारकांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी, असा आदेशही तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दिला.

    सांगली : मिरजेतील (Miraj) वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने (Dukan) पाडल्याप्रकरणी जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar ) यांना तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दणका दिला. जागेवरील मिळकतधारकांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी, असा आदेशही तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दिला.

    मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असणारी ५१ गुंठे जागा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विकत घेतल्याचा दावा केला होता. या जागेवर मिळकतधारकांनी अतिक्रमणे केली असून ती काढण्यासाठी पडळकर यांनी त्यांच्या टोळीसह चार जेसीबी घेऊन रातोरात दुकाने पाडली होती. जागा माझीच असून अतिक्रमणे काढण्यासाठी दुकाने पाडली असल्याचा दावा पडळकर यांनी केला होता. या प्रकरणाच्या राड्यात दहा दुकानांचे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी पडळकर यांच्यासह टोळीतील शंभर जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. परंतु, राड्यानंतर मिळकतधारकांकडून जागेवर प्रत्यक्ष कब्जा असल्याचा दावा करण्यात आला होता. घडलेल्या प्रकारानंतर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार कुंभार यांनी याबाबत सुनावणी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करून पाडलेली बांधकामे ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते.

    मुदतवाढीची मागणी फेटाळली

    जागेवरील कब्जा सिद्ध करण्यासाठी तहसीलदार कुंभार यांनी पडळकर व मिळकतधारकांना कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली होती. त्यासाठी तीन वेळा सुनावणी घेण्यात आली. यासाठी शुक्रवारी (दि. २०) तहसीलदारांनी अंतिम सुनावणी घेतली. परंतु त्यावेळी देखील पडळकर यांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ मागितली होती. तहसीलदार कुंभार यांनी ही मागणी धुडकावून निकाल देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तहसीलदार कुंभार यांनी घेतलेल्या सुनावणीमध्ये संबंधित वादग्रस्त जागेवर १७ मिळकतधारकांचा कब्जा असल्याचे सिद्ध झाले होते.

    न्यायालयात जाण्याचे आदेश

    मिळकतधारकांनी सादर केल्या कागदपत्रावरून संबंधित जागेवर मिळकतधारकांचा कब्जा आहे. या आदेशाविरुद्ध पडळकर यांनी न्यायालयात दाद मागावी, असे आदेश देखील तहसीलदार कुंभार यांनी यावेळी दिले. मिळकतधारकांच्या वतीने अॅड. ए. ए. काझी, अॅड. नितीन माने, ॲड. समीर हंगड, अॅड. नागेश माळी यांनी काम पाहिले.

    मिळकतधारकांच्या बाजूने निकाल

    मिळकतधारकांचा पेढे वाटून जल्लोष तहसीलदार कुंभार यांनी मिळकतधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने मिळकतधारांनी पेढे वाटून जल्लोष केला. निकाल येताच काही मिळकतदारांनी पाडली दुकाने उभारण्यास सुरुवात देखील केली.