तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत, सलमान खानसारखं संरक्षण मला का नाही?

प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर रविवारी पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन गोळीबार केला. या घटनेनंतर सगळीकडे एकाच खळबळ माजली होती. सलमानच्या घरावर नेमकं कोणी गोळीबार केला याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

  प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर रविवारी पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन गोळीबार केला. या घटनेनंतर सगळीकडे एकाच खळबळ माजली होती. सलमानच्या घरावर नेमकं कोणी गोळीबार केला याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. गोळीबार झाल्यानंतर सलमानच्या घराजवळ असलेली सुरक्षा वाढवण्यात आली आहे.याच मुद्यावरून आता ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, दिवंगत अभिषेक घोसाळकर(Abhishek Ghosalkar) यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर (Tejashwi Ghosalkar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

  अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर माझ्याही जीवाला धोका आहे, मला सलमान खानप्रमाणे सुरक्षा का नाही? असा प्रश्न तेजस्वी घोसाळकर यांनी उपस्थित केला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. सलमान खानच्या घरी गोळीबार झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याचा हा गोळीबार नेमका कोणी केला, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

  फेसबूक लाइव्ह चालू असतानाच घोसाळकरांची हत्या

  ८ फेब्रुवारीला ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह चालू असताना मॉरिस नरेन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतःवर देखील गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोघांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेल्यानंतरही अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणावर अजूनही निकाल लागलेला नाही, असा आरोप तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे. तसेच गेल्या महिन्यात घोसाळकर कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली होती. अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी या गोळीबार प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट लिहीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

  काय म्हणाल्या तेजस्वी घोसाळकर?

  अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीने त्वरित कारवाई केली. या हाय-प्रोफाईल घटनेवर त्वरित लक्ष केंद्रित केले गेले. पण माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा उलगडा करण्याकडे पोलिस दुर्लक्ष करत आहेत. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर तपासासाठी गुन्हे शाखेची सर्व पथक एकत्र आली. मात्र मॉरिस नरेन्हाकडून माझे पती अभिषेक घोसाळकर यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली त्या मर्डर केसचा तपास केला जात नाही, असा आरोप तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे. त्यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

  अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर माझ्या जीवालाही धोका आहे. माझ्या सुरक्षेकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. मला सलमान खानसारखे संरक्षण, सुरक्षा का दिली जात नाही ? असा सवालही तेजस्वी यांनी विचारला आहे. एखाद्या व्यक्तीची सामाजिक स्थिती कशी आहे, तो सेलिब्रिटी आहे की सामान्य व्यक्ती असा विचार न करता त्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे,असे त्यांनी सांगितले आहे.