summer in nagpur

उन्हाळ्यात विदर्भातील जवळपास सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात पहिल्यांदा असं झालं की उन्हाळ्यात नद्या दुथडी भरून वाहत होत्या. तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अवकाळी पावसाने अधूनमधून हजेरी लावल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली.

  नागपूर: विदर्भातील (Vidarbha) नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला ही शहरे दरवर्षी उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक गाठतात. दरवर्षी तापमान काही अंश सेल्सिअसने वाढलेले असते. मात्र यंदाच्या उन्हाळ्याने गेल्या तीस वर्षांचा विक्रम मोडला आहे. विदर्भातील या वर्षीचा उन्हाळा (Heat In Vidarbha) हा सगळ्यात थंड उन्हाळा म्हणून नोंदवला गेला आहे. (Summer In Vidarbha)

  मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात विदर्भाचं सरासरी तापमान 42.1 अंश सेल्सिअस असतं. मात्र यावर्षी हे सरासरी तापमान 39.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. या वर्षी विदर्भात फक्त दोनच दिवस अकोल्याचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. विदर्भाचे तापमान हे बहुतांश दिवस 40 ते 42 अंश सेल्सियसच्या घरात होते. नागपूर, चंद्रपूर सारख्या शहराचे तापमान या वर्षी 45 अंश सेल्सिअसच्या खाली असल्याचं पाहायला मिळालं. नागपूरमध्ये या वर्षी फक्त एक दिवस 14 मे ला सगळ्यात जास्त म्हणजे 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

  पावसाच्या हजेरीमुळे तापमान झाले कमी
  विदर्भात सर्वाधिक तापमान आतापर्यंत हे 2007 साली चंद्रपूरमध्ये होते. ते 49 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते तर नागपूरचे सर्वाधिक तापमान 2013 मध्ये 47.9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. उन्हाळ्यात विदर्भातील जवळपास सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात पहिल्यांदा असं झालं की उन्हाळ्यात नद्या दुथडी भरून वाहत होत्या. तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अवकाळी पावसाने अधूनमधून हजेरी लावल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली.

  ग्लोबल वॉर्मिंगमुळे देखील वातावरणावर परिणाम होत आहे. मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या तिन्ही महिन्यांमध्ये अवकाळी पावसाने विदर्भात हजेरी लावली. यंदाच्या उन्हाळ्यात संपूर्ण विदर्भातच ऊन – पावसाचा खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे काही दिवसांचा अपवाद वगळता यंदा विदर्भातील नागरिकांना उन्हाळा तितका जाणवला नाही.

  विदर्भात राजस्थानातून येते उष्ण लाट
  विदर्भातील उन्हाची लाट विशेषत: राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांवर अवलंबून असते. कोरडे वातावरण असल्यास उष्णलाट येऊन तापमानात वाढ होते. या उन्हाळ्यात तसं चित्र दिसलं नाही. विदर्भात जरी उन्हाळा पुर्वीच्या वर्षांच्या तुलनेने कमी जाणवला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. काही ठिकाणी तर उष्माघातामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत.