शाहू कालीन मंदिरे बनली धोकादायक ; मानवाडीतील मंदिराकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची ग्रामस्थांची मागणी

  बाजार भोगाव : पन्हाळा तालुक्यातील मानवाड, पैकी आढाववाडी येथील शाहुकालीन मंदिरांची दुरावस्था होत असून पुरातत्व खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या शाहु महाराजांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या मंदिरांची डागडूजी करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

  कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी कोलीक,चाफेवाडी, वाशी, गोठणे, पडसाळी ही गावे विस्थापित करून या ठिकाणचे जंगल वन्य प्राण्यांसाठी राखीव ठेवले होते. बर्किचा सडा ते मूढागड या ठिकाणी ४० किलोमीटर अंतराचा चर वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी खोदला होता. शाहू महाराज या ठिकाणी शिकारीसाठी येत होते. या ठिकाणी राजांनी स्वतःसाठी एक राजवाडा बांधला होता. घोडे बांधण्यासाठी पागा बांधली होती. ती जागा आज थटी या नावाने ओळ खली जाते. ह्या वाड्याचा पायाचा आकार ४० ते ५० गुंठे परिसरात होता. आता त्याचेच अस्तित्व संपत चालले असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी असणाऱ्या जंगलात हत्तींसाठी मोठे चर मारले होते, ते आजही अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर या वाड्यासमोरच साडेतीन शक्ती पिठातील एक पीठ असणारे आई अंबाबाईचे मंदिर व शक्तीची देवता समजले जाणारे प्रभू श्रीराम भक्त हनुमानाचे मंदिर आहे. मानवाडपैकी आढाववाडी येथील लोकांचे असे म्हणणे आहे की, शाहू महाराज यांच्या मंदिरालगतच त्याच्या बाजूलाच धान्यांचे कोठार होते. मात्र आज या ठिकाणी त्याचे अवशेषच शिल्लक असल्याचे दिसतात.

   पुरातत्व खात्याने या स्थळांचा विकास करावा
  ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरचे छत्रपती मालोजी राजे यांच्या आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यांनी सांगितले की, याची इतिहासात कुठेही नोंद पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले. या पवित्र स्थळांची दयनीय अवस्था झाली आहे. तरी पुरातत्व खात्याने या स्थळांना भेट देऊन याची माहिती घ्यावी. त्यामुळे दुर्गम भागातील
  ही पवित्र असणारी मंदिरे पर्यटक स्थळ म्हणून विकसित होतील, आणि दुर्गम भागाचा विकास साधला जाईल. तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या पवित्र स्थळांचा विकास करून या मंदिराचा जीर्णोद्धार करावा. अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

  अंबाबाई मंदिराच्या बांधकामाची मोठ्या प्रमाणात  दुरवस्था झाली आहे.बांधकामातील दगड पूर्णपणे निखळून पडत आहेत. बांधकाम  कोसळू नये. यासाठी ग्रामस्थांनी लोखंडी अॕगलने तात्पुरता टेकू देऊन आधार दिला आहे. पण तेबांधकाम कधीही कोसळू शकते. त्यामुळे याची तातडीने दुरुस्ती करणेची गरज आहे.

  पुरातत्व विभागाने या मंदिराची नोंद घ्यावी. अंबाबाई व हनुमान मंदिर ही दोन मंदिरे शाहू महाराजांच्या काळातील असून या मंदिरातील सुंदर मूर्ती आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने त्वरित या मंदिराचा विकास करून मानवाड हे पर्यटक स्थळ म्हणून विकसित करावे.

  - फुलाजी पाटील (सरपंच,मानवाड)