गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला जाणाऱ्या ४ भाविकांना टेम्पोने उडवलं; धुळ्यातील घटना

धुळे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जात असलेल्या चार भाविकांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत एका चिमुकलीसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

    धुळे : धुळे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जात असलेल्या चार भाविकांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत एका चिमुकलीसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. तीन वर्षीय चिमुकलीच्या पायावरून टेम्पो गेल्यानने तिला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, एका १४ वर्षीय मुलाच्या पोटावरुन टेम्पो गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    धुळे शहरातील जुना आग्रा रोड मार्गाने दरवर्षी गणपती मंडळांकडून बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघते. पारंपारिक वाद्य तसेच डीजे आणि इतर वाद्यांच्या निघणारी मिरवणूक बघण्यासाठी अनेक भाविक गर्दी करतात. हे चारही भाविक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जात होते.

    यावेळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असलेल्या एका टेम्पोचे अचानक ब्रेक फेल झाले. काही कळण्याच्या आतच टेम्पोने रस्त्यावरून जाणाऱ्या या चारही भाविकांना धडक दिली. या घटनेमध्ये ३ वर्षीय सायली जोहरी तसेच तिची आई जस्सी जोहरी आणि पिंकी जोहरी हे तिघेही जखमी झाले आहे.

    दरम्यान, अपघातानंतर या तिघांनाही तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायली जोहरी या तीन वर्षीय चिमुकलीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तिची आई गंभीर जखमी झाली आहे. तसेच एका १४ वर्षीय मुलाच्या पोटावरून टेंपो गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. सदर घटना घडल्यानंतर टेम्पो चालकाने घटना स्थळाहून पळ काढण्याची माहिती समोर येत आहे.