पिरंगुटजवळ टेम्पो ‘सुसाट’; 6 वाहनांना धडक देत सात जणांना केलं जखमी

भरधाव मालवाहू टेम्पोने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची घटना पिरंगुट परिसरात घडली. अपघातात टेम्पो चालक व इतर सहाजण जखमी झाले आहेत. अपघातात एका चारचाकीसह पाच दुचाकींचे नुकसान झाले. याप्रकरणी टेम्पोचालकावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : भरधाव मालवाहू टेम्पोने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची घटना पिरंगुट परिसरात घडली. अपघातात टेम्पो चालक व इतर सहाजण जखमी झाले आहेत. अपघातात एका चारचाकीसह पाच दुचाकींचे नुकसान झाले. याप्रकरणी टेम्पोचालकावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गोविंद लाल (वय २७, मूळ उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. नाशिकच्या ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. अपघातात पाटील यांच्यासह डॉ. मंगेश गायकवाड (वय ३८), बजरंग माझिरे (वय ५०, रा. भुकूम), पूनम माझिरे (वय २४, रा. भूकूम), श्रीकांत वाघमारे (वय ३३,रा. शिवणे), तसेच टेम्पोचालक लाल आणि मदतनीस (क्लिनर) हंसराज हिरालाल गौतम (वय १८ वर्षे) हे जखमी झाले आहेत.

    मालवाहू टेम्पोत वीट आणि सिमेंट होते. टेम्पो पिरंगुट घाटातून पौडकडे निघाला होता. टेम्पोत क्षमतेपेक्षा जास्त माल होता. घाटातील तीव्र उतारावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पोने एकापाठोपाठ पाच दुचाकी आणि मोटारींना धडक दिली. वाहनांना धडक दिल्यानंतर टेम्पो उलटला, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.