Two women in Pune were cheated of 30 lakhs by cyber thieves, read in detail

  पुणे : जुने फर्निचर खरेदी करण्याचा मोह चांगलाच महागात पडला असून, सायबर चोरट्यांनी एकाची १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी हडपसरमधील ५२ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जुन्या गृहोपयोगी वस्तू आणि फर्निचरची खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर तक्रारदार यांनी जुने फर्निचर विक्रीची जाहीरात दिली होती.

  मोबाईलमधील व्यवहारांची माहिती

  सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. फर्निचर खरेदी करायचे आहे, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. लिंक उघडताच त्यांच्या मोबाईलमधील व्यवहारांची माहिती सायबर चोरट्यांना मिळाली. चोरट्यांनी बँक खात्याची माहिती घेतली. माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी त्यांच्या बँकेकडून ५ लाखांचे कर्ज त्वरित मंजूर करून घेतले, तसेच त्यांच्या खात्यातील रक्कम अन्य खात्यात वळवित ११ लाख ७२ हजारांची फसवणूक केली.

  बँक अधिकारी असल्याचे सांगत १३ लाखांची फसवणूक
  बँक अधिकारी असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी एकाची १३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. ते पिंपरीतील खासगी कंपनीत नोकरीस आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तक्रारदाराचे खाते एका खासगी बँकेत आहे. चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. बँक अधिकारी असल्याचे सांगितले. बँकेकडून खातेदारांची माहिती घेण्यात येत आहे.

  चोरट्यांकडून १२ लाख ८० हजार रुपये दुसऱ्या खात्यात हस्तांतरित

  आधारकार्ड, पॅनकार्ड, डेबिट कार्डची माहिती चोरट्यांनी त्यांच्याकडून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यांचा विश्वास संपादनकरून ओटीपी घेतला. तक्रारदारांनी ओटीपी सांगताच चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून १२ लाख ८० हजार रुपये दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तपास करत आहेत.