Tendupatta laborers attacked by a herd of bears, women seriously injured

दादापूर येथील १४ महिला-पुरुषांचा गट एकत्रितरित्या जंगलात तेंदूपत्ता संकलन करीत होते. दरम्यान अस्वलांच्या कळपाने एकाएक काही महिलांवर हल्ला चढविला. अस्वलांच्या हल्ला होताच बाजूला असलेल्या सहकारी मजूर यांनी त्वरित अस्वलांच्या दिशेने धाव घेतली. आरडाओरडा होताच अस्वलाचे कळप घटनास्थळावरुन पसार झाले.

  कुरखेडा : तेंदूपत्ता संकलन करीत असलेल्या महिला मजूरांवर अस्वलांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात ४ महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना ७ मे रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील दादापूर गावाजवळील कव-याल झट्याल जंगल परिसरात घडली. सिमा रतिराम टेकाम (२५), लता जिवन मडावी (४५), पल्लवी रमेश टेकाम (३५) व रश्मीला आनंदराव टेकाम (४०) सर्व रा. दादापूर अशी अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिलांची नावे आहेत.

  दादापूर येथील जंगल परिसरात कालपासून तेंदूपत्ता संकलनास सुरुवात झाली आहे. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास दादापूर येथील महिला-पुरुष असा १४ मजूरांचा गट गावापासून ५ किमी अंतरावर असलेल्या कव-याल झट्याल जंगल परिसरातील कोहका कक्ष क्रमांक ४४७, ४४८ मध्ये तेंदूपत्ता संकलन करीत होते. दरम्यान ४ ते ५ च्या संख्येत असलेल्या अस्वलाच्या कळपाने अचानक महिलांवर हल्ला चढविला. यात सिमा टेकाम, लता मडावी, पल्लवी टेका रश्मीला टेकाम या चार महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जमखींना तत्काळ रुग्णवाहिकेने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  यात प्रकृती गंभीर असल्याने रश्मीला टेकाम, पल्लवी टेकाम व लता मडावी यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. यावेळी पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोरे, रामगड क्षेत्र सहाय्यक एस. एम. कंकलवार, कोहका क्षेत्र सहाय्यक व्ही. एम. तुमराम, बीट रक्षक सी. के. चौधरी, डी. बी. रामपूरकर आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रामगडचे वनरक्षक बी. डी. रामपूरकर, मालेवाडाचे वनरक्षक बाबूराव तूला वी, डी. एम. उईके यांनी रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली.

   मोठा अनर्थ टळला

  दादापूर येथील १४ महिला-पुरुषांचा गट एकत्रितरित्या जंगलात तेंदूपत्ता संकलन करीत होते. दरम्यान अस्वलांच्या कळपाने एकाएक काही महिलांवर हल्ला चढविला. अस्वलांच्या हल्ला होताच बाजूला असलेल्या सहकारी मजूर शेवंता उसेंडी, रेशमा उसेंडी, निलीमा उसेंडी, सनया टेकाम, आनंदराव मडावी, जिवन मडावी, रामचंद्र टेकाम, रतिराम टेकाम, आनंदराव टेकाम यांनी त्वरित अस्वलांच्या दिशेने धाव घेतली. आरडाओरडा अंती अस्वलाचे कळप घटनास्थळावरुन पसार झाले. सहकारी मजूरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलल्या जात आहे.

  जखमींना आर्थिक मदत देणार : दिघोळे

  अस्वलांच्या हल्ल्यात जमखी झालेल्या महिलांना वनविभागाने तत्काळ आर्थिक मदत देण्याची माणगी मनोज दुनेदार यांचे सह ग्रामस्थांकडून केली जात आहे. वनविभागाच्या आदेशान्वये जखमींना उपचारार्थ तत्काळ आर्थिक मदत देण्याचे आश्वासन पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोळे यांनी दिले आहे.