maratha-reservation

राज्यातील वातावरण (Maharashtra Politics) गेल्या काही महिन्यांपासून विविध जातींच्या (Maratha Reservation) आरक्षणावरून ढवळून निघाले आहे. त्याचे परिणाम आता गावोगावी दिसू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी एकोप्याने राहणाऱ्या गावगाड्यातील समाजात आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्त धुसफूस सुरू आहे.

    मुंबई : राज्यातील वातावरण (Maharashtra Politics) गेल्या काही महिन्यांपासून विविध जातींच्या (Maratha Reservation) आरक्षणावरून ढवळून निघाले आहे. त्याचे परिणाम आता गावोगावी दिसू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी एकोप्याने राहणाऱ्या गावगाड्यातील समाजात आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्त धुसफूस सुरू आहे. त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येऊ लागली असून, सोशल मीडियावर एकमेकांवर जहरी टीका केली जात आहे.

    २०२३ च्या अखेरीस सर्वत्र आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. ओबीसी आणि मराठा या दोन प्रमुख वर्गासह अन्य वर्गाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे. धनगर समाजाची एस. टी. प्रवर्गाचे आरक्षणाची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. या मागणीसाठीही आंदोलने सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरक्षण मिळालेला आणि न मिळालेला समाज अशी सरळसरळ दुफळी निर्माण झालेली आहे.

    ओबीसी प्रवर्गाने अधिकचे आरक्षण घेतले असून, त्यांच्यातूनच आम्हाला वाटा हवा, तो आमचा हक्क असल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी ओबीसी नेत्यांची वा समाजाची मागणी आहे.