दुचाकी फ्लायओवरवरून खाली कोसळली; चौघांचा मृत्यू, २ चिमुकल्यांचाही समावेश

    नागपूर : रस्ते अपघातांचे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शुक्रवारी नागपूरच्या (Nagpur) सक्करदरा परिसरात एक भीषण अपघात घडला असून या अपघातात दुचाकीवरील चौघे जण सुमारे ७० ते ८० फूट उंचीवरून खाली फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ चिमुकल्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

    नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर एका अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. दुचाकीवरील चौघे सुमारे ७० ते ८० फूट उंचीवरून खालच्या रस्त्यावर फेकले गेल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतले असून तो कार मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती आहे. फ्लायओव्हर वरून खाली फेकले गेलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या चौघांचा मृत्यू झाला असून मृत पावलेल्यांमध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर अनियंत्रित चारचाकी वाहनाने धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकी वर बसलेले चौघेजण गंभीर जखमी आहेत.