संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने; एकमेकांविरोधात तुफान घोषणाबाजी

संभाजीनगरमध्ये प्रचारावेळी महायुतीचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले आहेत. एकमेकांसमोर विरोधामध्ये घोषणाबाजी करत प्रचार केला जात आहे.

    संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. संभाजीनगरमधील लढाई देखील अटी तटीची होणार आहे. महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार प्रचार करत आहेत. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्यापूर्वी प्रचारावेळी महायुतीचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले आहेत. एकमेकांसमोर विरोधामध्ये घोषणाबाजी करत प्रचार केला जात आहे.

    लोकसभा निवडणूकीमध्ये संभाजीनगर मतदारसंघाची देखील चर्चा आहे. महायुतीकडून राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तर त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे आव्हान असणार आहे. तर महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत संभाजीनगरमध्ये होताना दिसत आहे. चौथ्या टप्प्यामध्ये लोकसभेच्या संभाजीनगरमध्ये मतदान पार पडणार आहे.

    चौथ्या टप्प्यातील मतदान होणार असल्याने आज संभाजीनगरची प्रचार तोफ थंडावणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही आघाडींकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे आज शहरातील भागामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत. दोन्ही गटाकडून आपापल्या उमेदवारांसाठी घोषणाबाजी केली जात आहे. रस्त्याच्या एकाला बाजूला ठाकरे गट तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेतील दोन्ही गट संभाजीनगरमध्ये आमने सामने आलेले आहेत.