ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना प्रचारसभेत चक्कर; उष्माघाताचा परिणाम, उपचार सुरु

भर उन्हामध्ये प्रचार सभा आणि रॅली काढल्या जात आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना प्रचारसभेमध्ये उष्माघातामुळे सभेमध्येच भोवळ आली.

    धाराशिव – सध्या राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वांना काळाजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र सध्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु असल्यामुळे प्रचार देखील जोरदार सुरु आहे. भर उन्हामध्ये प्रचार सभा आणि रॅली काढल्या जात आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना प्रचारसभेमध्ये उष्माघातामुळे सभेमध्येच भोवळ आली.

    धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची सभा होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी धाराशिवमध्ये जंगी सभा घेतली. माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, आमदार सचिन अहेर यांच्यासह अनेक दिग्गजांनी धाराशिवला हजेरी लावली. यावेळी उन्हाच्या पारा चढलेला असताना सभा सुरु होती. हजारो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. भर सभेमध्ये कैलास पाटील यांना चक्कर आली. त्यामुळे ते व्यासपीठावर कोसळले. त्यांना कार्यकर्त्यांनी तातडीने पाणी दिले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेले.

    कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार कैलास पाटील यांना उष्माघातामुळे हा त्रास झालाय. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा सुरु होती. यावेळी अचानक आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आहे. ते चक्कर येऊन जमिनीवर पडले. घटनेचं गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेलं. कैलास पाटील यांना रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.